महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी, या हेतूने पिंपरी पालिकेने सुरू केलेल्या ‘पवनाथडी जत्रे’त उत्तरोत्तर राजकारणच होऊ लागले. श्रेयाच्या चढाओढीमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या पवनाथडीचे ठिकाण ‘सांगवी की पिंपरी’ यावरून यंदाही वाद रंगला. अखेर, पिंपरीतील एचए कंपनीच्या मैदानावर शिक्कामोर्तब झाले. येत्या १२ ते १६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या पवनाथडीत स्टॉल मिळावा, यासाठी ८०० च्या घरात अर्ज दाखल झाले आहेत.
पिंपरीतील पवनाथडी हे राजकीय वादाचे केंद्रिबदू बनले असून यंदाही वादाची परंपरा कायम राहिली. महिला बालकल्याण समितीने पिंपरीत पवनाथडी घेण्यासाठी मंजूर केलेला प्रस्ताव स्थायी समितीने तीन आठवडे तहकूब ठेवला. स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे यांना पवनाथडी सांगवीत घ्यायची होती, हे त्यामागचे कारण होते. दोन्ही समित्यांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे ‘सावळा गोंधळ’ झाला, ‘सांगवी-पिंपरी’चा तिढा कायम राहिला. बराच काथ्याकूट झाल्यानंतर सलग तिसऱ्या वर्षी सांगवीत पवनाथडी नको, अशी सूचना अजित पवारांनी केल्याने पिंपरीवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे शितोळे हिरमुसले. मात्र, ते काहीही करू शकत नव्हते. एचए च्या मैदानावर जानेवारीत साहित्य संमेलन असल्याने पवनाथडी फेब्रुवारीत घेण्याचे ठरले. त्यानुसार, १२ ते १६ फेब्रुवारी असे पाच दिवस पवनाथडीचे कार्यक्रम होणार आहेत. पवनाथडीत बचत गटाला जागा मिळावी, यासाठी पालिका प्रशासनाकडे तब्बल ८०० च्या घरात अर्ज आल्याचे सांगण्यात येते. उपलब्ध स्टॉल्सची संख्या ३५० असताना दुपटीहून अधिक अर्ज आले आहेत. सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर यांच्याकडे संयोजनाची जबाबदारी आहे. केवळ शहरातील बचत गटांनाच जागा मिळू शकणार आहे. मात्र, वाटपावरून वादविवाद, वशिलेबाजी होणार, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.