राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जगदीश शेट्टी यांचे पद अवैध ठरवण्यात आल्यानंतर रिक्त झालेल्या त्यांच्या चिंचवडच्या रामनगर-विद्यानगर प्रभागासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला. १७ एप्रिलला पोटनिवडणूक होणार असून, दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
पालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या प्रभागातून शेट्टी निवडून आले. तथापि, त्यांच्या निवडीस आव्हान देण्यात आले होते. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने शेट्टी यांचा जातीचा दाखला रद्द ठरवून तो जप्त करण्याची कारवाई केली. आयुक्त राजीव जाधव यांनी राज्य निवडणूक आयोगाला वस्तुस्थिती कळवली. त्यानंतर शेट्टींना देण्यात आलेले फायदे परत घेत त्यांना दिलेली मानधनाची रक्कम वसूल करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर, मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. आता पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, १७ एप्रिलला मतदान आणि १८ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.