लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

पिंपरी : चिंचवडच्या बिजलीनगर ते गुरुद्वारा दरम्यानचे भुयारी मार्गाचे काम रडतखडत सुरू असले तरी खर्चाची कोटींची उड्डाणे मात्र सुरूच आहे. नव्याने चार कोटींच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि पिंपरी पालिकेच्या संथ कारभारामुळे स्थानिक  रहिवाशी कमालीचे त्रस्त आहेत.

निगडी-प्राधिकरण ते रावेतला जोडणाऱ्या बिजलीनगर ते गुरुद्वारा चौक या मार्गावरील भुयारी मार्गासाठी मूळ प्रशासकीय मान्यता १५ कोटींची होती. लघुत्तम दर सादर करणाऱ्या ठेकेदाराला ३ मार्च २०१८ ला कामाचे आदेश देण्यात आले. त्यानंतर, ३० डिसेंबर २०२० ला वाढीव खर्चास मान्यता देतानाच कामाची मुदत मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली. ती मुदत पूर्ण होऊनही पाच महिने उलटले. तरीही काम अपूर्णच आहे. आता नव्याने वाढीव चार कोटींच्या खर्चास स्थायी समितीने बिनबोभाट मान्यता दिली आहे.

भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यापासून येथील जनजीवन एकप्रकारे विस्कळीत झाले असून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. दररोजच्या त्रासाला स्थानिक रहिवासी, व्यापारी कंटाळले आहेत. सर्व बाजूने झालेल्या कोंडीतून सुटका कधी होणार, अशी विचारणा नागरिक करत आहेत. तथापि, याकडे कोणाचे लक्ष नाही.

प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी करावयाच्या इतर कामांमध्येच बराच कालावधी गेला. भर वस्तीत हा प्रकल्प होत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, अशी सारवासारव अधिकारी करत आहेत.त्यक्षात काम संथपणेच सुरू असून संगनमताने खर्चाचा आकडा  प्रवाढतोच आहे. या संदर्भात, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता, त्यांनी दूरध्वनीला प्रतिसाद दिला नाही.

संथपणे काम करण्याचा विक्रम प्रस्थापित होईल, इतके संथपणे हे काम सुरू आहे. अधिकाऱ्यांकडे कसलेही नियोजन नाही. थातूरमातूर कारणे देऊन वेळकाढूपणा सुरू आहे. रहिवाशांनी आंदोलने केली, की कामाचा वेग वाढतो. नंतर पुन्हा काम थंडावते. परिसरातील नागरिक, व्यापारी वैतागले आहेत.

– कौस्तुभ नवले, रहिवाशी, बिजलीनगर

विविध तांत्रिक अडचणी निर्माण होत गेल्या, परिणामी काम पूर्ण होण्यात विलंब झाला. आता अडचणी दूर झाल्या आहेत. लवकरच काम पूर्ण होईल.

– नामदेव ढाके, स्थानिक नगरसेवक, चिंचवड