पिंपरी महापालिकेतील चिंचवडच्या मोहननगर-काळभोरनगर प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा खून झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १० जानेवारी (रविवार) २०१६ मध्ये ही पोटनिवडणूक होणार आहे. बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
निवडणूक आयोगाचे अवर सचिव ध. मा. कानेड यांनी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, १५ डिसेंबरपासून उमेदवारी अर्जाचे वाटप तसेच अर्ज स्वीकृती करण्यात येणार आहे. २३ डिसेंबरला अर्जाची छाननी असून २८ डिसेंबरला उमेदवारी मागे घेण्याचा दिवस आहे. ३० डिसेंबरला चिन्हांचे वाटप आहे. त्यानंतर १० जानेवारीला मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी ११ जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
टेकवडे राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. ही जागा कायम राखण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. टेकवडे यांच्या पत्नी सुजाता टेकवडे यांना उमेदवारी देण्यात येणार असून केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे. तथापि, निवडणूक घेण्याची वेळच येऊ नये, यासाठी राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी केली आहे. अन्य पक्षांकडून इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करत आहेत.