पुणे : चिंचवड येथील महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रात रविवारी दुपारी आग लागली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह शिवाजीनगर परिसरातील महावितरणच्या तीन लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत झाला.
दरम्यान, आग नियंत्रणात आली असून, बिघाड झालेला भाग बंद ठेवून बाकीचा भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच दुपारी तीन वाजेपर्यंत बहुतांश ठिकाणांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने पूर्ववत करण्यात आल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
महापारेषणच्या चिंचवड येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात रविवारी (६ सप्टेंबर) दुपारी सुमारे १२ वाजून २५ मिनिटांनी तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. चिंचवड उपकेंद्रातील २२ केव्ही सीटी आणि ब्रेकरमध्ये स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. परिणामी, पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण, रावेत, काळेवाडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, पुनावळे, ताथवडे आदी भागांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. तसेच शिवाजीनगर, औंध व गणेशखिंड भागातील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला.
महापारेषणकडून बिघाड झालेला भाग बंद ठेवून उर्वरित यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. तर पर्यायी मार्गांचा वापर करून बहुतांश भागांतील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
शिवाजीनगर परिसरासह मेट्रोचा वीजपुरवठा खंडीत
चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या रहाटणी आणि गणेशखिंड वाहिनीवर परिणाम झाल्याने शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर गावठाण, मॉडेल कॉलनी, बालगंधर्व आदी भागांतील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला. दीड तासांच्या प्रयत्नांनतर सुमारे १ वाजून ५० मिनिटांनी परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. गणेशखिंड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून पुणे मेट्रोलाही होणारा वीजपुरवठाही काही काळ बाधीत झाला.
पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरातील २ लाखांहून अधिक ग्राहकांना फटका
बिघाडामुळे महावितरणच्या वीजपुरवठ्यावर परिणाम होऊन पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरातील सुमारे २ लाख ६० हजार ग्राहक, तर शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, बालगंधर्व आदी परिसरातील सुमारे ५० हजार ग्राहक, अशा एकूण सुमारे ३ लाख १० हजार ग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला.
निगडी परिसरातील सव्वालाख ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत
निगडी, यमुनानगर, बिजलीनगर, रावेत, मामुर्डी, देहूरोड, चिंचवड, ताथवडे, वाकड आदी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास काहीसा विलंब होत आहे. या भागातील सुमारे सव्वालाख ग्राहकांना ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.
आंबेठाण व तळेगावलाही फटका
महावितरणने तळेगाव शहराचा वीजपुरवठा खोपोलीतून पर्यायी मार्गाद्वारे पूर्ववत केला. त्यामुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला. मात्र औद्योगिक वीजपुरवठा पूर्ववत करण्यात तांत्रिक अडचणी असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. तर आंबेठाण उपकेंद्राचा दुपारी चार वाजून २० मिनिटांनी सुरळीत झाला. अंदाजे दीड हजार उद्योगांना या बिघडाचा फटका बसला.
