पुणे : विमाननगरमघील मसाज पार्लरमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) चौकशी करण्यात येेणार आहे. अटकेच्या भीतीने महिलेने इमारतीतून उडी मारली होती. या घटनेत तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात महिलेच्या पतीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दिली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पतीने केली आहे.

विमाननगर भागातील एका मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांची कारवाई, तसेच अटकेची भीती वाटल्याने महिलेसह मसाज पार्लरच्या व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. मसाज पार्लरमधील व्यवस्थपाकाच्या पायाला दुखापत झाली होती. दरम्यान, या घटनेनंतर सीआयडीच्या पथकाने मंगळवारी विमाननगर भागातील इमारतीस भेट दिली. सीआयडीच्या पथकाकडून या प्रकरणात चौकशी करण्यात येणार आहे. संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत.

विमाननगर भागातील एका इमारतीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित मसाज पार्लरवर कारवाई केली. त्या वेळी महिला पोलीस कर्मचारी तेथे होत्या. अटकेची भीती वाटल्याने मसाज पार्लरमधील महिलेसह व्यवस्थापकाने दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. पोलिसांनी मसाज पार्लरमध्ये प्रवेश केला. तेव्हा तेथे एक महिला होती. चौकशीत मसाज पार्लरमधील महिलेसह व्यवस्थापकाने उडी मारल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक तळमजल्यावर गेले. तेव्हा महिला जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. व्यवस्थापकाच्या पायाला दुखापत झाल्याचे उघडकीस आले. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.