नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरुकता वाढत असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र वेगळीच स्थिती पाहायला मिळत आहे, कारण आताच्या आर्थिक वर्षांत पुण्यात सिगारेटच्या विक्रीमध्ये सुमारे १८ टक्क्य़ांची वाढ झाली आहे. पुणे शहरात दिवसाला सुमारे १ कोटी सिगारेटस्-बिडय़ांची, तर जिल्ह्य़ात सुमारे २ कोटी सिगारेटस्-बिडय़ांची विक्री होत असल्याची माहिती पुढे आली आहे. शासनाने अलीकडे सुगंधी तंबाखू व सुगंधी सुपारी यांच्यावर बंदी घातल्यापासून ही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष शरद मोरे यांनी ही माहिती दिली. ही आकडेवारी पाहता ‘धूम्रपान करणे आरोग्यास घातक असल्याचा’ इशारा सिगारेट पाकिटावर दिलेला असूनही पुणेकर या व्यसनांपासून दूर जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदीचा कायदाही शहरभर धाब्यावर बसवला जात असल्याचे पाहायला मिळाले आहे.
शहरातील महाविद्यालये, विविध कार्यालय, ऑफिस यांच्याजवळील चहाच्या टपऱ्या, नाष्टय़ाची दुकाने, सार्वजनिक जागा अशा बहुतांश जागी धूम्रपान केले जात असल्याचे दिसून येत आहे. यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. शहरात केल्या जाणाऱ्या धूम्रपानाच्या प्रमाणात तब्बल १८ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांच्या धूम्रपानाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. ही वाढ १५ टक्क्य़ांची आहे. याबाबत मोरे यांनी सांगितले, ‘‘पुण्यात २०१३-१४ वर्षांत सिगारेट विक्रीमध्ये १८ टक्के वाढली आहे. ही वाढ शासनाने सुगंधी तंबाखू बंद केल्यापासून ही वाढ झाली आहे. जिल्ह्य़ात दिवसाला २ कोटी तर शहरात १ कोटीच्या वर सिगारेट-बिडय़ांची विक्री होते. पानपट्टय़ांवर १८ वर्षांखालील मुलांना सिगारेट दिली जात नाही. मात्र, अशी विक्री होत असल्याचे आढळल्यास पान शॉपवर दंडात्मक कारवाई आम्ही करतो. पण जनरल स्टोअर्स, किरकोळ दुकानदार यांच्याकडून याचे पालन होत असल्याचे दिसत नाही.’’
धूम्रपान करणाऱ्यांची संख्या किती?
पुणे शहरात दर दिवशी सुमारे १३ लाख लोक धूम्रपान करतात. त्यात पुरुषांची संख्या ११ लाख ५ हजार, तर महिलांची संख्या १ लाख ९५ हजार इतकी आहे. पुणे जिल्ह्य़ात दररोज सुमारे २५ लाख लोक धूम्रपान करतात. त्यात पुरुषांची संख्या २२ लाख ७५ हजार, तर महिलांची संख्या २ लाख २५ हजार इतकी आहे. त्याचबरोबर यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. जिल्ह्य़ात दरवर्षी ५६ हजार लोकांचा धूम्रपानामुळे मृत्यू होतो. शहरात ही संख्या २३ हजार इतकी आहे. तसेच, धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचेही मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. या कारणामुळे जिल्ह्य़ात वर्षांला ५ हजार ५०० लोकांचा, तर शहरात १ हजार ७०० लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती शरद मोरे यांनी दिली.