राज्यातील सव्वाचारशे एकपडदा चित्रपटगृहे बंदच

आर्थिक अडचणीत असलेल्या आणि राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा असलेल्या एकपडदा चित्रपटगृहांचा बंद मराठी चित्रपटांना मारक ठरत आहे.

तीनशे मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत   

विद्याधर कुलकर्णी

पुणे : आर्थिक अडचणीत असलेल्या आणि राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा असलेल्या एकपडदा चित्रपटगृहांचा बंद मराठी चित्रपटांना मारक ठरत आहे. पन्नास टक्के प्रेक्षकसंख्येमध्ये चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर राज्यातील सव्वाचारशे चित्रपटगृहे अद्यापही बंदच आहेत. जवळपास तीनशे मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून हक्काचे घर असलेली एकपडदा चित्रपटगृहे लवकर सुरू न झाल्यास चित्रपटांचे करायचे काय,  असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

चित्रपटगृह बंद करून व्यवसाय बदलासाठी परवानगी द्यावी ही एकपडदा चित्रपटगृह मालकांची मागणी शासनाकडे प्रलंबित आहे. राज्यभरामध्ये साधारणपणे साडेपाचशे असली तरी अस्तित्वात असलेल्या एकडपडदा चित्रपटगृहांची संख्या ४५४ आहे. शंभर टक्के प्रेक्षकसंख्येची परवानगी शासनाने दिल्यानंतरच चित्रपटगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ज्यांना चित्रपटगृह सुरू करण्याची इच्छा आहे त्यांना मुभा देण्यात आली असल्याची माहिती पूना एक्झिबिटर्स असोसिशनचे अध्यक्ष सदानंद मोहोळ आणि माजी अध्यक्ष दीपक कुदळे यांनी दिली. अर्थात शासनाने परवानगी दिल्यानंतरही राज्यातील ३० टक्के चित्रपटगृहे सुरू होण्याची शक्यता नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांसमवेत दिवाळीपूर्वी एक बैठक झाली होती. त्यामध्ये एकपडदा चित्रपटगृह कायमस्वरूपी बंद करून अन्य व्यवसाय करण्याची परवानगी दिली तर शासनाला भरपूर उत्पन्न मिळेल आणि चालकांनाही उत्पन्न मिळेल, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे, असे कुदळे यांनी सांगितले. सध्या राज्यभरामध्ये जेमतेम २५ एकपडदा चित्रपटगृहे सुरू आहेत. 

पन्नास टक्के आसन क्षमतेने सुरू असलेली चित्रपटगृहे आणि बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये (मल्टिप्लेक्स) मराठी चित्रपटांना केवळ एका खेळापुरते मिळणारे स्थान या पाश्र्वभूमीवर प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या तीनशे मराठी चित्रपटांची कोंडी झाली आहे. पन्नास टक्के आसन क्षमतेने चित्रपटगृहे सुरू झाली तरी त्या नियमांत मराठी चित्रपट प्रदर्शित करणे निर्मात्यांना परवडणारे नाही. एकपडदा चित्रपटगृहे सुरू करायची झाली तरी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या पैशांतून वीजबिल, कर्मचाऱ्यांचे पगार आणि देखभाल दुरुस्ती खर्च भागत नाही हे वास्तव असल्यामुळे ही चित्रपटगृहे सुरू होत नाहीत.

मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cinemas movie state closed ysh

Next Story
आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले