‘वुई मेक पुणे सिटी सेफ’ उपक्रमाचा प्रारंभ

शहराचा विस्तार वाढत आहे. एकटे पोलीस शहराची सुरक्षा सांभाळू शकत नाही. शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पुणेकरांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे मत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी व्यक्त केले.

पुणे पोलिसांकडून ‘वुई मेक पुणे सिटी सेफ’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. या प्रसंगी विलू पूनावाला फाउंडेशनच्या नताशा पूनावाला, वेकींज इंडिया प्रा. लि. चे जगदीश राव, फिनोलेक्स उद्योग समूहाचे अनिल बाबी, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल तसेच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त रवींद्र सेनगावकर, साहेबराव पाटील उपस्थित होते. या निमित्ताने काढण्यात आलेल्या फेरीचा प्रारंभ शिवाजीनगर मुख्यालयातून करण्यात आला.

पोलीस आयुक्त शुक्ला म्हणाल्या, की हिंजवडीतील संगणक अभियंता रसीला राजू हिचा सुरक्षारक्षकाकडून खून झाला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आणि नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘बडी कॉप’ अ‍ॅप सुरू करण्यात आले. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात होणारे गैरप्रकार आणि छेडछेडीच्या घटना रोखण्यासाठी ‘पोलीस काका’ उपक्रम सुरू करण्यात आला. सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यातून ‘सिटी सेफ’ अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. पुणेकरांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून ‘वुई मेक पुणे सिटी सेफ’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.