काँग्रेसचा जनसंवाद सभेत संताप, उग्र आंदोलनाचा इशारा

पिंपरी: वारंवार विनंती अर्ज, निवेदने देऊनही पिंपळे निलख, विशालनगर या दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात पाण्याची टंचाई आणि गढूळ पाण्याची समस्या कायम आहे, असे सांगत अशीच परिस्थिती यापुढे कायम राहिल्यास पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना काळे फासू , असा इशारा काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सचिन साठे यांनी सोमवारी जनसंवाद सभेत दिला. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठ्याकडे साठे यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. पिंपळे निलख, विशाल नगर भागात अपुऱ्या, अनियमित व दुषित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण आहेत. या भागात सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांचा आतापर्यंत पाण्याच्या टँकरसाठी लाखो रूपयांचा खर्च झाला आहे. करदात्या नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. येथील पाणीसमस्येकडे लक्ष वेधण्यासाठी १० हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले होते. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात “बूस्टर” यंत्रणा उभारू, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात, गेल्या दोन महिन्यांपासून यात काहीही प्रगती झालेली नाही. दिवसाआड पाणीपुरवठा होत होताच, त्यात गढूळ पाण्याची भर पडली आहे. यात सुधारणा न झाल्यास गढूळ पाण्याने अधिकाऱ्यांना आंघोळ घालू,  असा इशारा साठे यांनी दिला आहे.