पुणे : अंगणवाडी सेविकांचे अत्यल्प मानधन, कायमस्वरुपी शासकीय नोकरी, वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधी आणि सामाजिक सुरक्षा या प्रलंबित प्रश्नांबाबतचा लढा राष्ट्रीय पातळीवर तीव्र करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी संघटनेकडून शनिवारी घेण्यात आला.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन (सिटू) संलग्न अखिल भारतीय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संघटनेच्या ११ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला बाणेर येथील एमराल्ड हाॅल येथे सुरुवात झाली. १७ फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या अधिवेशनाचे उद्घाटन सीटूच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष के. हेमलता आणि फेडरेशनच्या अध्यक्षा उषा राणी यांच्या हस्ते करण्यात आले.
अखिल भारतीय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संघटनेच्या सरचिटणीस ए. आर. सिंधू यांनी गेल्या तीन वर्षांचा अहवाल सादर केला. या चार दिवसीय होणाऱ्या अधिवेशनात महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, केरळ, आसाम, गुजरात यांसह २५ राज्यांतील सुमारे ७०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
गेल्या पाच दशकांत अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी देशभरातील लाखो बालके, गरोदर व स्तनदा माता यांना पोषण, आरोग्य व शिक्षणाच्या सेवांचा लाभ दिला आहे. समाजनिर्मितीच्या महत्त्वाच्या योगदानात अंगणवाडी सेविका सातत्याने कार्यरत असून, याच घटकातील कर्मचारी, सेविका, मदतनीसांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मानधन तत्वावर ठेवण्यात आलेल्या सेविकांना अद्याप कायमस्वरुपी घेण्यात आलेल नसून यांनाही अल्पशा मानधनावर राबवून घेतले जात आहे.
अंगणवाडी सेविकांची देखील अशीच अवस्था असून अल्प मानधनावर वर्षानुवर्षे काम करत आहे. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे तसेच आरोग्याचे भविष्यातील नोकरीचे प्रश्न प्रलंबित असून, याबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे वेळोवेळी निवेदने पाठवले, आंदोलने केली, तरी कुठलाच निर्णय घेण्यात आला नसल्याची हतबलता व्यक्त करत यावेळी सरकारच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
पुढील तीन दिवसीय अधिवेशनात जनवादी महिला संघटना, किसान सभा, एसएफआय, डीवायएफआय या संघटनांच्या नेत्यांची भाषणे होणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी सीटूचे राष्ट्रीय अध्यक्ष काॅ. सुदीप दत्ता, फेरडेशनच्या अध्यक्षा उषा राणी, राज्य पातळीवरील अध्यक्ष डाॅ. डी. एल. कराड, जिल्हाध्यक्ष प्रा. अजित अभ्यंकर, सरचिटणीस वसंत पवार, अंगणवाडी संघटनेच्या अध्यक्षा शुभा शमीम, महासचिव संगीता कांबळे आणि जिल्हा सचिव रजनी पिसाळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयापासून क्वीन्स गार्डनपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचा समारोप सभा घेऊन होणार असून, तीव्र लढा देण्यासाठी यावेळी पुढील रणनीतीची घोषणा करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

