तापमानात चढ-उताराची शक्यता

निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे शहरात पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. मात्र, दोन दिवसांत पुन्हा आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने तापमानात-चढ उतार होऊ शकतात, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

शहर आणि परिसरामध्ये गेल्या आठवडय़ामध्ये गारवा चांगलाच वाढला होता. रात्रीचे किमान तापमान १६ ते १७ अंशांपर्यंत खाली आले होते.मात्र, या आठवडय़ात अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि त्यानंतर निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीचा परिणाम म्हणून शहरात आकाशाची स्थिती ढगाळ झाली. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन ते २० अंशांच्याही पुढे गेले होते. त्यामुळे थंडी गायब झाल्याती स्थिती होती. शुक्रवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. गुरुवारी रात्रीही निरभ्र आकाशाची स्थिती होती. त्यामुळे किमान तापामानात एकाच दिवसात २.८ अंशांची घट होत ते शुक्रवारी १७.९ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे पुन्हा गारवा वाढला.

दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या पवन या चक्रीवादळाचा प्रभाव अद्यापही कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात आहे. मुंबईजवळच्या चक्रीवाताची स्थिती निवळत असून, ढगाळ वातावरणाची तीव्रता कमी होत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यातील काही भागातच ढगाळ वातावरण राहील. ८ डिसेंबरनंतर पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शुक्रवारी नागपूर येथे सर्वात कमी १०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

आठवडय़ात थंडीत आणखी वाढ

आकाशाची स्थिती सध्या निरभ्र असल्याने रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा जाणवतो आहे. मात्र, पुढील दोन दिवस म्हणजे ८ आणि ९ डिसेंबरला पुन्हा ढगाळ हवामान राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. त्यानंतर १० डिसेंबरपासून पुन्हा आकाश निरभ्र होणार आहे. परिणामी त्यानंतर किमान तापमान १४ अंशांपर्यंत खाली जाऊन थंडी वाढणार असल्याचा अंदाज आहे.