पुणे : पतीच्या छळामुळे महिलेने विषारी ओैषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पतीविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

राणी तिरुपती कुऱ्हाडे (वय २५, रा. स्नेहांकित काॅलनी, कर्वेनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत कुऱ्हाडे यांचा भावाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी कुऱ्हाडे मूळच्या कर्नाटकातील विजापूरच्या आहेत. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर पतीने त्यांचा छळ सुरू केला. छळामुळे बहिणीने २६ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात विषारी ओैषध प्राशन करुन आत्महत्या केली, असे राणी कुऱ्हाडे यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील तपास करत आहेत.

पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पोलिसांनी अटक केली. सराइताकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तसेच दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

इरफान रईसउद्दीन मलिक (वय ३२, रा. संकेत विहार, काळेपडळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसरमधील काळेपडळ परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी मलिक हा दादा गुजर शाळेजवळ थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अतुल पंधरकर, दाऊद सय्यद यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. मलिक याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे सापडली. बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी मलिक याच्याविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक आयुक्त अमित शेटे, उपनिरीक्षक विनायक गुरव, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहिद शेख, लक्ष्मण काळे यांनी ही कारवाई केली.

मालवाहू वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

मालवाहू वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना लोणीकंद-थेऊर रस्त्यावर घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही.

या प्रकरणी मालवाहू वाहन (पिकअप) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी रितेश काळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद-थेऊर रस्त्यावरील उंद्रे वस्ती परिसरात २३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पादचारी निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. पादचाऱ्याचे वय अंदाजे वय ५० वर्ष असून, ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता राेकडे तपास करत आहेत.