पुणे : महापालिकेच्या महापौर तसेच उपमहापौरपदी कोणाची वर्णी लागणार, यावर आज (मंगळवारी) शिक्कामोर्तब होणार आहे. महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज मंगळवारी (३ फेब्रुवारीला) दाखल केले जाणार आहे. त्यामुळे शहराचे नवीन महापौर कोण असेल, हे निश्चित होणार आहे. दरम्यान, महापौरपदी वर्णी लागावी, यासाठी ज्येष्ठ महिला सदस्यांमध्ये जोरदार चुरस आहे.
महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी येत्या ९ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. याचा कार्यक्रम महापालिका प्रशासनाने जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी आज दुपारी अकरा ते दोन या वेळेत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहेत. महापालिकेत भारतीय जनता पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नवीन महापौर, उपमहापौरपदी कोण विराजमान होणार हे निश्चित होणार आहे. या पदावर भाजप अनुभवी नगरसेवकांना संधी देणार, की धक्कातंत्राचा वापर करणार हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा अंतिम निर्णय घेणार आहेत.
दरम्यान, महापौर, उपमहापौर पदासाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात भाजपबरोबर मित्रपक्ष म्हणून अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये सहभागी आहे. महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपच्या विरोधात लढवली होती. मागील निवडणुकीमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळूनही विकास केला नाही.
केंद्र तसेच राज्याकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळूनही तो खर्च करण्यात आला नाही, अशी जाहीर टीका करत महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे या निवडणुकीत काही काळ रंगत आली होती. भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत क्रमांक दोन चा पक्ष ठरला आहे.
राज्यात भाजप बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहभागी असल्याने महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यात येऊ नये, यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. मित्र पक्षाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एक पाऊल मागे घेण्याची तयारी केली आहे. दोन क्रमांकाचा पक्ष ठरूनही राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी उमेदवार न दिल्यास काँग्रेसने महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.
भाजपच्या विरोधात महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवार उभा केला जाणारा असून यासाठी आवश्यक त्या सूचना नवनिर्वाचित काँग्रेसच्या सदस्यांना देण्यात आल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचे १५ सदस्य विजयी झाले असून शिवसेना (ठाकरे) पक्षाचा एक सदस्य विजयी झाला आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचा सदस्य देखील काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपने १६५ पैकी ११९ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली आहे. यंदा महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाले आहे. या पदासाठी चाैथ्यांदा नगरसेविका झालेल्या वर्षा तापकीर, रंजना टिळेकर यांच्यासह तिसऱ्यांदा नगरसेविका झालेल्या मानसी देशपांडे यांच्यासह मंजूषा नागपूरे, स्मिता वस्ते यांची नावे चर्चेत आहेत. तसेच, नव्याने निवडून आलेल्या दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्यासह उज्ज्वला जंगले यांच्या नावांची चर्चा आहे.
महापौरपद अडीच वर्षांसाठी राखीव आहे. त्यामुळे प्रत्येकी दहा महिन्यांसाठी एक अशा पद्धतीने तीन नगरसेविकांना संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पुण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात कोअर कमिटीची बैठक झाली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते. तर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
पर्वती विधानसभा मतदारसंघाला संधी?
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर २०१७ मध्ये कसबा विधानसभा आणि कोथरूड विधानसभा मतदारासंघातील उमेदवारांना महापौरपदासाठी संधी देण्यात आली होती. तसेच, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी देखील कसबा, कोथरूड, वडगावशेरी, कँन्टोन्मेंट मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे या वेळी पर्वती विधानसभा मतदारसंघाला महापौरपद द्यावे, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असून, हे प्रयत्न यशस्वी ठरतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

