राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारपासून (१० डिसेंबर) तीन दिवसीय ‘शरदोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर आणि कलादालन येथे होणाऱ्या या महोत्सवाद्वारे शरद पवार यांनी विविध क्षेत्रात दिलेले योगदान आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व हे परिसंवाद, छायाचित्र प्रदर्शन, शिल्पकला प्रात्यक्षिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उलगडले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रकार विशाल केदारी यांनी शरद पवार यांच्या विविध माध्यमांमध्ये चितारलेल्या ८२ भावमुद्रांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते होणार आहे. ‘लोकजीवनाशी एकरुप शरद पवार’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे सायंकाळी पाच वाजता व्याख्यान होणार आहे. ‘मैत्र जीवांचे’ या अनोख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खासदार श्रीनिवास पाटील, उद्योजक विठ्ठल मणियार, कर्नल (निवृत्त) संभाजी पाटील आणि बारामतीचे जवाहर वाघोलीकर हे शरद पवार यांच्याबरोबरच्या अतूट मैत्रीचे अनोखे किस्से सांगणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे, संवाद पुणे संस्थेचे सुनील महाजन, निकिता मोघे या वेळी उपस्थित होत्या.

हेही वाचा… पुणे मनसेमध्ये नाराजी नाट्य जोरात; वसंत मोरेंबाबत पुणे मनसे पदाधिकारी म्हणाले “येत्या दोन दिवसात… “

’शेती-मातीशी जोडलेले व्यक्तिमत्त्व : शरद पवार’ या विषयावर रविवारी (११ डिसेंबर) दुपारी बारा वाजता सुधीर भोंगळे यांचे व्याख्यान होणार आहे. तर, ’शरद पवार यांचे राजकारण काल, आज, उद्या’ या विषयावर सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या परिसंवादात वात्रटिकाकार रामदास फुटाणे, भाजप प्रवक्ते माधव भंडारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, पत्रकार मृणालिनी नानिवडेकर आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे होणार आहेत. सोमवारी (१२ डिसेंबर) रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध शिल्पकार सुरेश राऊत हे शरद पवार यांचे शिल्प साकारणार आहेत. ‘शरदाचे चांदणे’ या सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात मनीषा निश्चल आणि सहकारी मराठी-हिंदी गीते सादर करणार आहेत. या कार्यक्रमात सिंबायोसिसचे संस्थापक डाॅ. शां. ब. मुजुमदार आणि ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या हस्ते पं. नंदकिशोर कपोते, उस्ताद उस्मान खाँ, सतारमेकर मजिदभाई, पं. उदय भवाळकर, पांडुरंग घोटकर आणि वैशाली जाधव यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: City ncp organized three day sharadotsav on the occasion of sharad pawar s birthday pune print news vvk 10 zws
First published on: 06-12-2022 at 18:37 IST