पिंपरी पालिका शिक्षण मंडळाच्या सभापतिपदाची बहुचर्चित निवडणूक गुरुवारी (१७ ऑक्टोबर) होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार ऐनवेळी उमेदवार जाहीर करणार आहेत. वयाची साठी ओलांडली असे म्हणत एकाने ज्येष्ठतेच्या मुद्दय़ावर, तर, अन्य इच्छुकांनी शिक्षक, कार्यकर्ता, अल्पसंख्याकांना संधी असे वेगवेगळे दावे सभापतिपदासाठी केले आहेत.
सभापती विजय लोखंडे यांच्या वादग्रस्त कारकिर्दीची समाप्ती झाल्यानंतर गुरुवारी नव्या सभापतिपदासाठी निवडणूक होत आहे. जवळपास नऊजणांनी सभापतिपदाची उमेदवारी मागितली असून आपापल्या ‘गॉडफादर’ कडे साकडे घातले आहे. अंतिम निर्णय अजितदादा घेणार आहेत. मंडळाच्या कारभाराला ते प्रचंड वैतागले आहेत. पदासाठी भेटायला येणाऱ्या इच्छुकांना ‘नीट कारभार करा’ अशी तंबी ते देत आहेत. लोखंडे हे आमदार विलास लांडे यांचे स्वयंघोषित समर्थक असले तरी त्यांना अजितदादांची शिफारस होती. सदस्य व सभापतिपद अजितदादांनीच त्यांना दिले होते. अन्य सदस्यांचा थेट अजितदादांपर्यंत वशिला नसल्याने त्यांना स्थानिक नेत्यांच्या मेहेरबानीवर अवलंबून राहावे लागणार आहे. तथापि, आपण सांगू त्यास पद मिळेल, याची खात्री नसल्याने प्रत्येकाला ‘तुझेच करतो’ असे गाजर स्थानिक नेते दाखवत आहेत. एक सदस्य एकसष्टी पार केलेला आहे. राष्ट्रवादीने ज्येष्ठ नागरिकांना गोंजारण्याचा कार्यक्रम हाती घेतल्याने जेष्ठत्वाच्या मुद्दय़ावर संधी द्यावी, अशी मागणी त्याने अजितदादांकडे केली आहे. एक इच्छुक शिक्षक आहे. शिक्षकास सभापतिपद दिल्यास विद्यार्थी व शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा नियोजनबध्द कार्यक्रम पार पाडू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. याशिवाय, अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व, कार्यकर्त्यांला संधी द्या, अशी मागणी करणारी निवेदने अजितदादांकडे देण्यात आली आहेत. यापैकी कोणाला व कोणत्या निकषावर संधी मिळते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.