लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : घेरा सिंहगड परिसरातील सांबरेवाडीमध्ये शनिवारी रात्री पूर्ववैमस्यातून दोन गटात हाणामारी झाली. हाणामारीत एका गटाकडून पिस्तुलातून गोळीबार, तसेच तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटातील आठ जणांना ताब्यात घेतले असून, त्याांच्याकडून गज, कोयता. एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
रोहित उर्फ भोऱ्या धर्मेंद्र ढिले (वय २२, रा. सांबरेवाडी, सिंहगड ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. हाणामारीत सोमनाथ अनंत वाघ ( वय २४, रा. सांबरेवाडी ) गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आल्या आहेत. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न व सशस्त्र मारामारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मंगेश उर्फ मुन्ना मोहन दारवटकर (वय २५, रा. कोंडगाव, ता. हवेली), वैभव उर्फ सोन्या शिवाजी जागडे (वय २०), सिद्धेश राजेंद्र पासलकर (वय २५, दोघे रा. आंबेड, ता. वेल्हा), प्रथमेश उर्फ भावड्या मारुती जावळकर (वय १८), सुमीत उर्फ दाद्या किरण सपकाळ (वय २०), केतन उर्फ दाद्या नारायण जावळकर (वय २३), वैभव किशोर पवार (वय १८), तेजस चंद्रकांत वाघ (वय २४, सर्व रा. खानापूर, ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे.
आणखी वाचा-‘स्मार्ट सिटी’पेक्षा ‘स्मार्ट व्हिलेज’ची गरज, नितीन गडकरी यांचे थेट भाष्य
घेरा सिंहगड परिसरातील सांबरेवाडीमध्ये वर्चस्वातून तेजस वाघ आणि रोहित ढिले यांच्यात वाद सुुरू होते. शनिवारी रात्री रोहित आणि तेजस यांच्यात वाद झाला. रोहितने तेजसला जिवे मारण्याची धमकी देऊन खानापूर चौकात बोलावले. तेजस त्याचे मित्र मंगेश दारवटकर, वैभव जागडे, संग्राम वाघ, सिद्धेश पासलकर, स्वप्निल चव्हाण, केतन जावळकर, गणेश जावळकर, प्रथमेश जावळकर, सोमनाथ वाघ, आकाश वाघ, सुमीत सपकाळ, वैभव पवार यांना घेऊन खानापूर चौकात आला. आरोपींनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. राेहित याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात रोहित याचा मृत्यू झाला, असे ओंकार धमेंद्र ढिले याने हवेली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
गोळीबारात सोमनाथ वाघ जखमी झाला असून, त्याचा मामा सुरेश दशरथ तागुंदे याने हवेली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. रोहितने तेजसला धमकी देऊन खानापूर चौकात बाेलावले. रोहित, त्याचे मित्र यश जावळकर, विकास नारगे, साहिल कोंडके, चेतन जावळकर, प्रवीण सांबारे यांनी सोमनाथ आणि त्याचा भाऊ तेजस यांना मारहाण केली. आरोपींनी सोमनाथवर पिस्तुलातून गोळीबार केल्याने तो गंभीर जखमी, असे तागुंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
आणखी वाचा-मुंबई-बेंगळुरू प्रवास आता अधिक वेगवान, होणार १४ पदरी महामार्ग
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सुनीलकुमार पुजारी, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाल्यामुळे सांबारेवाडीत तणाव निर्माण झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
ग्रामीण भागात दोन खून
उरळी कांचन परिसरात आर्थिक वादातून उद्योजकाने शेतकऱ्यावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. गोळीबारात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घेरा सिंहगड परिसरात मध्यरात्री वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून कोयता, लाठ्या काठ्यांचा वापर करण्यात आला. पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तसेच एक जण गंभीर जखमी झाला.