पुणे : ‘अभिजात संगीताविषयी मुलांच्या मनात कुठलाही पूर्वग्रह न ठेवता त्यांच्या आवाजाचा स्वभाव, पोत जाणून घेत संगीताची गोडी लावणे आवश्यक आहे. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये ग्रहणाशक्ती उत्तम असली तरी त्यांची विस्मरणशक्ती वाढली आहे. त्यामुळे त्यांना सोप्या पद्धतीने पण सातत्याने संगीत क्षेत्राकडे वळविणे गरजेचे आहे,’ असे मत प्रसिद्ध गायिका-संगीतकार आणि ‘कलांगण’ संस्थेच्या संस्थापिका डॉ. वर्षा भावे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

गानवर्धन संस्थेच्या वतीने प्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख यांच्या हस्ते वर्षा भावे यांना कृ. गो. धर्माधिकारी स्मृती संगीत संवर्धक पुरस्कार प्रदान करण्यात आला. धर्माधिकारी यांच्या पत्नी कुमुद धर्माधिकारी, गानवर्धनचे अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर, कोषाध्यक्ष सविता हर्षे या वेळी उपस्थित होत्या. उत्तरार्धात ‘मुलांचे संगीत शिक्षण आणि त्यातील मनोरंजनात्मक प्रयोग’ या विषयावर डॉ. वर्षा भावे यांच्याशी मंजिरी जोशी यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या बोल्त होत्या. रोहन देशमुख, सावनी परांजपे, जुई देशपांडे, विभा हरिश्चंद्रकर यांनी गीते सादर केली.

डॉ. भावे म्हणाल्या, ‘साहित्यिक आवाका वाढवत, स्वरांच्या अवतीभोवतीचे जग मुलांना मनोरंजन पद्धतीने शिकविण्यासाठी मी कार्य करत आहे. आनंदाने शिकलेले संगीत मुलांच्या मनात खोलवर रुजते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते.’ कलाकाराच्या अंगी स्वयंशिस्त असणे आवश्यक आहे, ही शिकवण मला धर्माधिकारी यांच्याकडून मिळाली, असेही त्यांनी सांगितले. देशमुख म्हणाले, ‘कला साधक नसतानाही धर्माधिकारी यांनी संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी केली. गानवर्धनच्या माध्यमातून त्यांनी कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. त्यांचा काटेकोरपणा, शिस्त, कार्यक्रमाची आखीव-रेखीव बांधणी आणि त्यातून मिळालेले यश याचा मी साक्षीदार आहे. संस्कारक्षम वयात मुलांना शास्त्रीय संगीताची गोडी लावण्याचे भावे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. सध्याच्या अस्थिर आणि गतिमान काळात अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य त्या सातत्याने करीत आहेत.