पुणे : ज्येष्ठ गायक डाॅ. वसंतराव देशपांडे यांचे शिष्य आणि वसंतरावांचे उत्तराधिकारी या नात्याने ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकात खाँसाहेबांची भूमिका साकारणारे गायक-अभिनेते पं. चंद्रकांत लिमये (वय ७५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुवाहाटी येथे गेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. पं. लिमये यांचा जन्म जन्म १९ ऑगस्ट १९५० रोजी झाला होता.
लहानपणापासूनच पं. नारायणराव व्यास, पं. वसंतराव राजोपाध्ये, पं. गजाननबुवा जोशी, पं. रत्नाकर पै, पं. चंद्रशेखर रेळे आणि पं. बाळकराम अशा गुरुंकडून त्यांना तालीम मिळाली. डाॅ. वसंतराव देशपांडे यांचा गुरु म्हणून बारा वर्षे परीसस्पर्श लाभला. नाट्यसंपदा संस्थेच्या ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकात डाॅ. वसंतराव देशपांडे यांच्यानंतर लिमये खाँसाहेबांच्या मुख्य भूमिकेत असत. ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटकातील स्वरराज छोटा गंधर्व यांनी अजरामर केलेली अश्विनशेठ ही भूमिका लिमये यांनी साकारली होती.
‘संत गोरा कुंभार’, ‘संगीत सौभद्र’ ‘तो मी नव्हेच’, ‘पती गेले ग काठेवाडी’ या नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. चंद्रकांत लिमये यांनी २००० मध्ये वसंतराव देशपांडे संगीत सभा या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ‘होरी के रंग’, ‘श्रुतीरंग वर्षा के’, ‘नाट्यरंग संगीताचे’, ‘हवेली संगीत’ असे संकल्पनांवर आधारित कार्यक्रम सादर केले होते.
