पिंपरी: शहरातील पाणीपुरवठा स्वच्छ व योग्य दाबाने करण्यात यावा, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, यासह दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांकडे शहरवासियांनी सोमवारी जनसंवाद सभांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरातील नागरीक आणि प्रशासनात सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे जलदगतीने निवारण करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार जनसंवाद सभांचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सोमवारी सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पार पडलेल्या जनसंवाद सभांमध्ये सर्व मिळून ७० तक्रारी मांडण्यात आल्या.

रस्त्यांवरील फुटलेले धोकादायक चेंबर व खचलेले पदपथ तातडीने दुरूस्त करावे, नाल्यातील कचरा काढण्यात यावा, अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करावी, शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नवीन नळजोडणी देण्याची प्रक्रिया सुलभ व वेगवान करावी, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून धूरफवारणी करावी, अर्धवट स्थितीत असणारी व रहदारीस अडथळा ठरणारी रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करावीत, सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता नियमितपणे करावी, धोकादायक असलेल्या झाडांची छाटणी करावी, अशा विविध तक्रारी तथा सूचना नागरिकांनी जनसंवाद सभेत केल्या.