स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पिंपरी पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातील ७५ ठिकाणी रविवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सर्व मिळून २५ हजार जणांनी सहभाग घेतला. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात आला.स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी महापालिकेने ‘स्वछाग्रह’ मोहिमेची सुरुवात केली असून त्याअंतर्गत पालिकेने रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. विविध स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडई असोसिएशन, व्हेंडर असोसिएशन, रिक्षा संघ, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, बचत गट, खाजगी आणि पालिका शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी असे सर्व मिळून २५ हजार जण मोहिमेत सहभागी झाले होते.

पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते रावेतला या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, आरोग्यप्रमुख उपायुक्त अजय चारठाणकर, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आदी यात सहभागी झाले होते. थेरगाव, रहाटणीत शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून हातात तिरंगा घेऊन मानवी साखळी तयार केली होती. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयुक्त पाटील म्हणाले की, शून्य कचरा संकल्पना राबवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची आहे. शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून कृतीशील राहावे. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण करण्याचा ध्यास आपण घेतला आहे. निरंतर शाश्वत विकास साधण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. स्वच्छता मोहिमेच्या उपक्रमांमधून निर्माण होणारा कचरा आपणच स्वच्छ केल्यास शहराचे आरोग्य देखील उत्तम राहण्यास मदत होईल, यासाठी सर्वांनी योगदान द्यावे.