मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि जनता यांच्या संवेदनशीलतेच्या बळावरच माळीण गावचे आदर्श पुनर्वसन झाले आहे. माळीणच्या धर्तीवर राज्यातील अन्य प्रकल्पांतील बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात माळीणकरांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही रविवारी दिली.

माळीण पुनर्वसन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त एस. चोक्किलगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, माळीणच्या सरपंच हौसाबाई आसवले, उपसरपंच तुकाराम चिमटे उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, कोणतीही दुर्घटना ही वाईटच असते, मात्र त्या दुर्घटनेनंतर शासन, प्रशासन आणि समाज एकत्र येतो, त्यावेळी दु:खाची तीव्रता कमी होते. माळीणच्या बाबतीत हेच घडले आहे. माळीणचे पुनर्वसन करताना शासनाबरोबरच प्रशासनानेही संवेदनशीलतेने काम केले. त्यामुळेच हे नवीन पुनर्वसित माळीण उभे राहिले. शासनाच्या सोबत समाजातील स्वयंसेवी संस्था एकत्र आल्यामुळे माळीणच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुकर झाली. प्रशासनानेही माळीणचे पुनर्वसन करताना जनसंवादावर भर दिला. त्यामुळे येथील लोकांना अपेक्षित असणारे पुनर्वसन झाले आहे.

कोणत्याही प्रकारच्या पुनर्वसनाची प्रक्रिया ही बाधितांसाठी क्लेशकारकच असते. जुन्या जागेत, गावात बाधितांच्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात. त्यामुळे पुनर्वसन करताना बाधितांच्या पाठिशी उभे राहून त्यांना धीर देण्याची आवश्यकता असते. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासनानेही संवेदनशीलता जपली तर आपली लोकशाही समृद्ध होईल. माळीण आणि परिसरातील धोकादायक असणाऱ्या सहा गावांच्या पुनर्वसनाचा आराखडा शासनाने तयार केला असून त्यासाठी तातडीने तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच माळीण आणि परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आसाने गाव तलावासाठी १४ कोटी ७७ लाख रुपयांचा निधीही शासन देणार आहे. जलसंधारणाच्या कामाला शासनाचे प्राधान्य आहे. आदिवासी जनतेच्या जिव्हाळ्याची पडकई योजना जिल्हास्तरावर वर्ग करण्यात आली असली तरी या योजनेला निधी कमी पडू देणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

शिवाजीराव आढळराव-पाटील, दिलीप वळसे-पाटील, माळीणचे ग्रामस्थ सुहास झांझरे यांनी मनोगत व्यक्त केले. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत फडणवीस यांच्या हस्ते बालकाला पोलिओ लस देण्यात आली. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी प्रास्ताविक केले. सुनील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. दौलत देसाई यांनी आभार मानले.