scorecardresearch

महापौरांचे लग्न अन् मुख्यमंत्र्यांची कोपरखळी

पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे हे अद्याप अविवाहित आहेत.

महापौरांचे लग्न अन् मुख्यमंत्र्यांची कोपरखळी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना महापौर नितीन काळजे.

पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे हे अद्याप अविवाहित आहेत. त्यांचे लग्न कधी होणार, हा तसा त्यांचा खासगी प्रश्न. मात्र, त्यांच्या मोशी-चऱ्होली प्रभागासह शहरातील नागरिकांच्या दृष्टीने तो उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांनीच जाहीरपणे खुमासदार टिप्पणी केल्याने आता या चर्चेत आणखीच भर पडली आहे.

महापौर काळजे हे अविवाहित आहेत, हे ठरावीक वर्तुळाबाहेर फारसे कोणाला माहिती नाही. ते सलग दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. यापूवी ते चऱ्होली प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. आमदार महेश लांडगे यांच्यासमवेत काळजे भाजपमध्ये आले. २०१७ च्या पालिका निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले. गेल्या वेळी खुल्या गटातून लढणारे काळजे यंदा मात्र ओबीसी प्रवर्गातून लढले. पिंपरी महापौरपदाचे आरक्षण ओबीसीसाठी राखीव आहे. पिंपरीत भाजपची सत्ता आली आणि लांडगे यांच्यामुळे काळजे यांची महापौरपदाची ‘लॉटरी’ लागली.

शहराच्या मुख्य राजकीय प्रवाहात आलेल्या नितीन काळजे यांचे अद्याप लग्न झाले नाही, हा आतापर्यंत त्यांचा वैयक्तिक विषय होता आणि पै-पाहुणे व गावापुरता मर्यादित होता. मात्र, महापौर झाल्यानंतर शहरभरात त्यांच्या लग्नाचा विषय चर्चेला आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्याला अपवाद राहिले नाहीत. भोसरी नाटय़गृहात शनिवारी झालेल्या पालिकेच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री गमतीने म्हणाले, महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची नागरिक ज्याप्रमाणे वाट पाहत आहेत, त्याचप्रमाणे, महापौरांच्या लग्नाची सर्व जण वाट पाहत आहेत.

लग्न कधी करायचे, हे त्यांनी ठरवायचे आहे. मात्र लग्नाला आम्हाला बोलवा, असे विधान मुख्यमंत्र्यांनी करताच सभागृहात प्रचंड हास्यकल्लोळ उडाला. यंदा त्यांचा लग्नाचा विषय अजेंडय़ावर आहे, असे मुख्यमंत्र्यांना कोणीतरी सांगितले. तेव्हा मी महापौर झालो होतो, तेव्हा माझेही लग्न झाले नव्हते आणि मलाही तेव्हा असाच त्रास झाला, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी महापौरांची बाजू घेत त्यांना सावरून घेतले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-08-2017 at 03:32 IST

संबंधित बातम्या