आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्यांनी ट्वीटद्वारे वाहिली श्रद्धांजली

विक्रम गोखले यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ”आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपट क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” असे ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

”अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले”

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ”मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व होते. भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणार्‍या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणार्‍या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना, असेही ते म्हणाले.

”विक्रम गोखलेंचे निधन चटका लावणारे”

विक्रम गोखलेंच्या निधनाच्या वृत्तावर विश्वास बसत नाहीये. एक कसदार राजबिंडा अभिनेता म्हणून त्यांनी रंगभूमी गाजवली. स्पष्ट संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम असत. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करून ते परत येतील, असे वाटत होते. पण दुर्दैव, मी या महान अभिनेत्याला आदरांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

हेही वाचा – BREAKING: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

”संवेदनशील अभिनेता हरपला”

”ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी तिन्ही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला. अभिनय कौशल्य व अनोख्या संवादशैलीने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. ५० वर्षे रंगभूमीची अविरत सेवा करत सामाजिक बांधिलकी जपणारे हरहुन्नरी कलावंत विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली

”कला क्षेत्रातील एक तेजस्वी तारा निखळला”

आपल्या कसदार अभिनयाने चित्रपट, टीव्ही आणि नाट्यप्रेमी रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रातील एक तेजस्वी तारा निखळला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार रोहित पवार यांनी दिली आहे.

तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक नव्हे तर सामाजिक क्षेत्राची ही खूप मोठी हानी झाली आहे.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, विक्रम गोखले यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर सहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde devendra fadnavis and other political leaders reaction on vikram gokhale death spb
First published on: 26-11-2022 at 15:54 IST