पुणे : दावोस कराराच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून, त्यातून जवळपास ७५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. तसेच, मुंबई आणि पुण्यापुरती मर्यादित असलेली औद्योगिक प्रगती राज्यातील इतर भागात नेण्याचे नियोजनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पुण्यातील ‘तौरल इंडिया’ कंपनीच्या सुपा (ता. पारनेर) एमआयडीसीतील अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार भागवत कराड, आमदार काशिनाथ दाते, सुरेश धस, विक्रमसिंह पाचपुते, तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भरत गीते व थोनी ॲल्युमिनियमचे लोथर थोनी आदी उपस्थित होते.
राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा समतोल राखण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी राज्याची औद्योगिक प्रगती केवळ मुंबई, मुंबई महानगर प्रदेश व पुणे या भागांपुरती मर्यादित होती. ती विकेंद्रित करून राज्याच्या सर्व भागांत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सुपा एमआयडीसी हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. केवळ सामंजस्य करार करून न थांबता, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्योग विभाग तत्परतेने काम करत आहे. दावोसमध्ये २०२५ मध्ये करण्यात आलेला करार अत्यंत वेगाने प्रत्यक्षात आला आहेत.
तौरल इंडियाचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. स्वतंत्र व आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला आयात करावी लागते त्या वस्तूंना सक्षम पर्याय देशातच निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या गोष्टी आता भारतात व विशेषतः महाराष्ट्रात भरत गीते यांच्यासारख्या उद्योजकांमुळे तयार होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर
देशाच्या अर्थव्यवस्थेने ११ व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू. भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या प्रवासात तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्राचा वाटा मोलाचा ठरणार आहे. या प्रवासात महाराष्ट्र भक्कम पाऊले टाकत आहे. दावोस दौऱ्यात १६ लाख कोटींचे करार करण्यात आले असून, त्यातील ७५ टक्के करार हे अंमलबजावणीच्या मार्गावर आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

