पुणे : वाहनांसाठी स्वस्त इंधनाचा पर्याय असलेला सीएनजी आता प्रतिकिलो दीड रुपयाने महागणार आहे. शुक्रवारी (८ मे) मध्यरात्रीपासून एक किलो सीएनजीसाठी ९२ रुपये २५ पैसे मोजावे लागणार असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह चाकण, तळेगाव, हिंजवडी परिसरातील वाहनधारकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे.
सीएनजीसाठी आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या खरेदी दरात वाढ झाल्यामुळे दरवाढ करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘वाहनांसाठी सीएनजीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, अद्यापही पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी हा इंधनाचा स्वस्त पर्याय आहे. सीएनजीमुळे प्रवासी चारचाकी वाहनधारकांना पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ४५ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे २२ टक्के बचत करता येते. रिक्षाचालकांना सुमारे २४ टक्के बचत करता येते,’ असे ‘एमएनजीएल’ने म्हटले आहे.
पीएनजीच्या दरात वाढ नाही!
दरम्यान, केवळ वाहनधारकांसाठी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली असून, घरगुती पीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली नसल्याचे ‘एमएनजीएल’कडून स्पष्ट करण्यात आले.
दरवाढीचे सावट
गेल्या काही वर्षांपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, आखतात सुरू असलेल्या युद्धामुळे देशातील इंधनामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच नैसर्गिक वायूच्या किंमती वाढल्याने वाहनांसाठी स्वस्त इंधन असलेल्या सीएनजीच्या दरामध्ये दीड रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ‘एमएनजीएल’ने घेतला. त्यामुळे मध्यमवर्गीय वाहनधारक आणि विशेषत: रिक्षाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पुण्यात सीएनजी वापरणाऱ्या वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. खाजगी कार, रिक्षा आणि पीएमपीएल बसेस इत्यादी वाहनांचा यात समावेश होतो. या दरवाढीमुळे अतिरिक्त आर्थिक भार सामान्य कुटुंबाच्या खिशावर पडणार असल्याचे चित्र आहे.
नेमके कारण काय?
नैसर्गिक वायूच्या जागतिक बाजारपेठेतील चढ-उतार आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरलेले मूल्य याचा परिणाम ‘इनपुट कॉस्ट’वर झाला. त्यामुळे एमएनजीएलला खरेदी कराव्या लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या ‘गॅस कॉस्ट’मध्ये वाढ झाली. परिणामी, हा आर्थिक बोजा सीएनजी वापरणाऱ्या ग्राहकांवर पडला आहे.
रिक्षाच्या भाड्यांवर परिणाम?
पुण्यातील रिक्षा मोठ्या प्रमाणात सीएनजी इंधनावर चालवल्या जातात. आता सीएनजी प्रतिकिलो दीड रुपयाने महाग झाल्याचा परिणाम रिक्षाचे भाड्यांवर होणार का, दरवाढीमुळे आगामी काळात रिक्षाचे भाडे वाढणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
