‘‘भारतातील तरूण हेच भारताचे भविष्य आहे आणि ते सुरक्षित हाती आहे, याचीही खात्री आहे. येत्या काळात विविध गरजांसाठी जग भारतातील युवाशक्तीवर अवलंबून असेल. मात्र, तरुणांनी मळलेल्या वाटांनी न जाता आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे,’’ असे मत भारतरत्न डॉ.सी.एन.आर. राव यांनी बुधवारी व्यक्त केले.भारती विद्यापीठाच्या १५व्या पदवी प्रदान समारंभात डॉ. राव बोलत होते. या वेळी डॉ.सी.एन.आर.राव यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (डी.लिट) पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या ३९ विद्यार्थ्यांना पीएच.डी आणि २९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देण्यात आली. या वेळी केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ.नरेंद्र जाधव, विद्यापीठाचे कुलपती आणि वनमंत्री डॉ.पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कुलसचिव जी.जयकुमार, परीक्षा नियंत्रक डॉ.विश्वास धाप्ते आदी उपस्थित होते.या वेळी राव म्हणाले, ‘‘खरे शिक्षण म्हणजे आवडीचे क्षेत्र निवडून त्यातील सखोल ज्ञान मिळवणे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी वेगळा मार्ग चोखाळणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणे आवश्यक आहे. येत्या काळात पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक युवाशक्ती असेल त्यामुळे शिक्षक, तंत्रज्ञान, डॉक्टर आदी गोष्टींसाठी जगभरातील देशांना भारतावर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळेच मला देशाच्या भवितव्याची काळजी वाटत नाही.’’या वेळी डॉ. जाधव म्हणाले, ‘‘देशाने उच्च शिक्षणावर व कौशल्य विकासावर अधिक भर देणे गरजेचे आहे. तरुणांनी वेळेचे नियोजन करून, समाजाप्रती आदराची भूमिका ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे.’’‘क्वीन ऑफ इंग्लंड’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (डी.लिट) पदवी प्रदान करण्यात आली. त्या वेळी आशा भोसले म्हणाल्या, ‘‘लहानपणी इंग्रजी चित्रपट पाहायचो तेव्हा त्यात काळे कपडे आणि डोक्यावर तुरा असलेली टोपी घातलेली मुले, मुली दिसायची. असा पोशाख आपण कधी घालणार असं तेव्हा वाटायचं. आज तसाच पोशाख घालण्याची संधी मिळाली आणि कोणताही अभ्यास न करता डी.लिट पदवी देऊन माझा गौरव करण्यात आला, याचा आनंद होत आहे.आज पदवी प्रदान समारंभाचे कपडे आणि तुरा असलेली टोपी घालून चालताना मला ‘क्विन ऑफ इंग्लंड’ झाल्यासारखे वाटते आहे.’’ या वेळी ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात..' हे गीत सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.