पुणे : ‘देशातील एकही वीजनिर्मिती प्रकल्प कोळशाअभावी बंद पडलेला नाही. कोळशाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असून, येत्या काळात खाणींमधील कोळसा पडून राहण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांनी गुरुवारी दिली. कोळसा वाहतुकीसाठी रूळांची संख्याही वाढवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’तर्फे आयोजित ‘एडब्ल्यूटीआयएस’ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन दुबे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर दुबे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अणुवैज्ञानिक डॉ. ज्येष्ठराज जोशी, हायड्रोजन इंधन तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. रमण वेदराजन, ‘इस्रो’चे माजी उपसंचालक नवलकिशोर गुप्ता, कंपनीचे अध्यक्ष मुकुंद जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप, सहकार्यकारी अध्यक्ष स्मिता शितोळे-जगताप आदी उपस्थित होते. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

दुबे म्हणाले, ‘देशभरात सध्या विजेची मागणी वाढली आहे. मात्र, कोळशाची कमतरता नाही. गेल्या काही वर्षांमध्ये कोळशाचे उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खाणींमधून काढलेला कोळसा वीजनिर्मिती प्रकल्पापर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक रेल्वे रुळांची संख्याही वाढविण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही काळांत प्रकल्पांबाहेर कोळासा पडून राहील.’ ‘युवा पिढीची ऊर्जा, नवकल्पना यांतून विज्ञान-तंत्रज्ञान आणि हरित उर्जेच्या क्षेत्रात देश आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करत आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवा पिढीने आपली बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि नवकल्पनांचे विश्व देशाच्या प्रगतीसाठी उपयोगात आणावे,’ असेही दुबे यांनी सांगितले.

‘खाणींमध्ये प्रदूषणाची समस्या’

‘कोळसा खाणींमध्ये सध्या प्रदूषणाची मोठी समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत आहेत. कोळसा रेल्वे रुळांपर्यंत कमीत कमी इंधन किंवा जैव-इंधनाच्या मदतीने पोहोचवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी कन्वेयर बेल्टची संख्या वाढविण्यात येत आहे. डिझेल गाड्यांऐवजी ई-वाहनांना प्राधान्य देण्यात येत आहे,’ असे केंद्रीय राज्यमंत्री कोळसा आणि खाणमंत्री सतीश चंद्र दुबे यांनी सांगितले.

‘संशोधनासाठी पायाभूत सुविधांचा अभाव’

‘देशात घन, द्रव्य आणि वायू स्वरुपात मोठ्या प्रमाणात बायोमास निर्माण होतो. हा ऊर्जेचा महाप्रचंड स्रोत आहे. जमिनीची मशागत आणि कस वाढवण्यासाठीही बायोमासचा वापर शक्य आहे. या बाबत प्रयोगशाळांमधील सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आता प्रत्यक्ष व्यवहारात हे संशोधन वापरात आणण्यासाठी यंत्रणा गरजेची आहे. या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. मात्र, नवकल्पना राबविण्यात आपण कमी पडत आहोत. आपल्या इथे चांगल्या दर्जाच्या प्रयोगशाळा नाहीत. संशोधनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांही सुधारण्याची गरज आहे. तसेच, आपली पारंपरिक मानसिकताही बदलली पाहिजे,’ असे मत डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी व्यक्त केले.