पुणे : किनारपट्टीवर अतिवृष्टी टाळण्यासाठी ढग समुद्रावर असतानाच त्यातून पाऊस पाडणे कृत्रिम पावसाच्या तंत्रज्ञानाने शक्य आहे. पुण्यातील भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील (आयआयटीएम) शास्त्रज्ञांनी याबाबतचा अभ्यास केला आहे. आजवर दुष्काळी स्थितीत कृत्रिम पाऊस पाडला जायचा; पण, आता अतिवृष्टी टाळण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करता येणे शक्य आहे, असे मत हा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ डॉ. तारा प्रभाकरन आणि डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. यामुळे मुंबई, कोलकाता, चेन्नईसारख्या किनारपट्टीवरील मोठ्या शहरांत अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी पूरस्थिती टाळणे शक्य होईल.

यापूर्वी अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्यात आले होते. त्यात कर्नाटकातील प्रयोग यशस्वी झाला होता. तसाच प्रयोग अतिवृष्टीच्या शक्यतेवेळी करणे, असा या अभ्यासाचा विषय आहे. यातील निरीक्षणांनुसार, समुद्रावरून बाष्पयुक्त ढग किनारपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच या ढगांतून खोल समुद्रात पाऊस पाडून किनारपट्टी, घाट परिसरात अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी पूरस्थिती काही प्रमाणात किंवा पूर्णपणे टाळणे शक्य आहे.

हेही वाचा – पावसाच्या सरींमध्ये गणरायाचे आगमन? जाणून घ्या, राज्यभरातील शनिवारचा पावसाचा अंदाज

‘चीन, दुबई, रशिया यांसारख्या देशात कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वीपणे राबविले जातात. कृत्रिम पाऊस पाडणारी यंत्रणा या देशांनी विकसित केली आहे. जमिनीवरील ढग आणि समुद्रावरील ढगांमध्ये शास्त्रीयदृष्ट्या खूप मोठा फरक आहे. समुद्रावरील ढग मोठ्या परिसरात पसरलेले असतात. समुद्रातून किनारपट्टीकडे ढग येण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होण्याची क्षमता असलेल्या ढगांमधून समुद्रात पाऊस पाडणे शक्य आहे. पण, दुर्दैवाने भारतात याबाबत व्यापक प्रमाणावर संशोधन झालेले नाही. आजही कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी जागतिक पातळीवर निविदा प्रसिद्ध करून जागतिक कंपन्यांना आमंत्रित करावे लागते. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भारताने आता कृत्रिम पाऊस पाडणारी यंत्रणा कायमस्वरूपी सज्ज ठेवली पाहिजे. त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करून दीर्घकालीन योजना तयार केल्यास आपल्याला प्रयत्नपूर्वक समुद्रातच कृत्रिम पाऊस पाडून अतिवृष्टी, पूरस्थिती टाळता येईल,’ असे मत डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मुंबईला २६ जुलै २००५ रोजी, तर चेन्नईला २०१५ आणि २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे महापुराचा फटका बसला होता. समुद्रावरून मोठ्या प्रमाणावर आलेल्या बाष्पयुक्त ढगांमुळे ही अतिवृष्टी झाली होती. असे प्रकार भविष्यात रोखण्यासाठी या प्रयोगाचा फायदा होऊ शकेल.

हेही वाचा – पिंपरी : गणेशोत्सवासाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त; ध्वनी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या सूचना

जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू

आयआयटीएममध्ये संगणकीय प्रारूपाच्या आधारे कृत्रिम पावसाबाबत अनेक प्रयोग झाले आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात किंवा दुष्काळी भागांत कृत्रिम पर्जन्यवृष्टी यशस्वी झाली आहे. समुद्रात कृत्रिम पाऊस पाडणे अशक्य नाही. पण, सहज शक्यही नाही. त्यासाठी व्यापक आणि दीर्घकालीन नियोजनाची गरज आहे. जागतिक हवामान संस्थेने (डब्ल्यूएमओ) त्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती आयआयटीएममधील शास्त्रज्ञ डॉ. तारा प्रभाकरन यांनी दिली.