पुणे : ‘सीओईपी’ तंत्रज्ञान विद्यापीठाच्या चिखली येथील संशोधन केंद्रात अत्याधुनिक स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. आठशे कोटी रुपये खर्च करून दोन टप्प्यांत उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांतर्गत देशातील पहिले स्वदेशी बॅटरी प्रोटोटायपिंग, पायलट-स्केल संशोधन आणि विकास केंद्र उभारले जाणार असून, पुण्यातील शैक्षणिक परिसरात प्रथमच लिथिअम-आयन बॅटरी सेल तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
‘सीओईपी’ तंत्रज्ञान विद्यापीठ आणि ‘जेएसडब्ल्यू प्रोजेक्ट्स’ यांच्यात बॅटरी तंत्रज्ञान केंद्र उभारण्याबाबतचा करार करण्यात आला. विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे, ‘जेएसडब्ल्यू’ कंपनी समूहातर्फे कार्यकारी उपाध्यक्ष नरेश ललवानी यांनी करारावर स्वाक्षरी केली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरुड, डॉ. एस. पी. महाजन, अधिष्ठाता प्रा. पी. ए. सदगीर, डॉ. रणजित दाते, प्रोफेसर-ऑफ-प्रॅक्टिस डॉ. सारिका केळकर, मंदार भाटवडेकर, विशेष कर्तव्य अधिकारी डॉ. अविनाश जोशी, ‘जेएसडब्ल्यू’चे वरिष्ठ उपाध्यक्ष अमिताभ सिंग, सहयोगी उपाध्यक्ष चंद्रकांत महालिंगम, उपमहाव्यवस्थापक विजय चौधरी, उपमहाव्यवस्थापक सुदीप सरकार या वेळी उपस्थित होते.
‘आयात करण्यात येणाऱ्या बॅटऱ्यांना सक्षम स्वदेशी पर्याय विकसित करण्याची, देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञान शिकण्यासह प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. बॅटरी तंत्रज्ञानाबाबत जगात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू असताना या केंद्रामुळे संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला अधिक व्यापक व्यासपीठ मिळणार आहे,’ असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांनी सांगितले.
‘अनेक दशकांपासून भारताने खनिज तेलाच्या आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च केले आहे. आता नव्या भारतासाठी अत्याधुनिक कौशल्ये आणि क्षमता विकसित करून बॅटरी भारतातच तयार करण्याची वेळ आली आहे. १७२ वर्षांची अभियांत्रिकी क्षेत्रातील गौरवशाली परंपरा असलेल्या ‘सीओईपी’ तंत्रज्ञान विद्यापीठाबरोबरची भागीदारी उद्योग, संशोधन, शिक्षण क्षेत्राला नवीन आयाम देणारी ठरेल,’ असे ‘जेएसडब्ल्यू’ ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी नमूद केले.
केंद्राचे वैशिष्ट्य काय?
बॅटरी तंत्रज्ञान केंद्र प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये विकसित केला जाणार असून, दोन्ही टप्प्यांसाठी मिळून आठशे कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सेल संशोधन आणि विकास केंद्र उभारण्यात येणार असून, येथे स्वदेशी लिथिअम-आयन, सोडिअम आयनसह इतर प्रगत रसायनशास्त्रावर आधारित बॅटरी सेलची रचना, सिम्युलेशन आणि प्रोटोटायपिंग केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्याचा विस्तार सेल प्रमाणीकरण केंद्र म्हणून केला जाणार असून, येथे १०० ते ६०० एच (ॲम्पीअर अवर) क्षमतेचे सेल तयार करण्याची क्षमता विकसित केली जाणार आहे. या केंद्रात विकसित करण्यात येणाऱ्या बॅटरींची कार्यक्षमता जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानांच्या तोडीची असावी, तसेच भारतातील हवामान आणि विविध उपयोगांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांची निर्मिती व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पातून एक हजार रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
