पुणे : सीओईपीने उद्योग, आघाडीची जागतिक विद्यापीठे, संशोधन संस्था, नवउद्यमी यांच्याशी भागीदारीच्या संधी शोधल्या पाहिजेत. विद्यापीठाने केवळ क्रमवारीतच नव्हे, तर संशोधन, नवोपक्रम, एकस्व अधिकार (पेटंट), तंत्रज्ञान हस्तांतरण, नवउद्यमी, जागतिक शैक्षणिक सहकार्यामध्ये भारतातील सर्वोच्च संस्थांपैकी एक बनण्याची महत्वाकांक्षा बाळगावी, भविष्यातील विद्यापीठे एकाकीपणे काम करू शकत नाही. शिक्षण क्षेत्र, उद्योग, सरकार आणि समाज एकत्र येऊन समस्या सोडवतील असे खुले व्यासपीठ विद्यापीठांना बनावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी केले.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात वर्मा बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. यशोधरा हरिभक्त आणि कुलसचिव डॉ. दयाराम एन. सोनवणे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत ननावरे या वेळी उपस्थित होते. ८८९ विद्यार्थ्यांना पदवी, तर ५८२ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. पदवीच्या १० विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, तर पदव्युत्तर पदवीच्या गुणवंत २५ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

विद्यार्थांना मार्गदर्शन करताना वर्मा म्हणाले, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये भारताच्या आर्थिक वाढीत आणि राष्ट्रीय विकासात अर्थपूर्ण योगदान देतील अशा तंत्र उद्योजकांच्या आणि नवोन्मेषकांच्या नवीन पिढीसाठी दिशा देणारी संस्था बनण्याची क्षमता आहे. संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवरच नाही, तर तिने घडवलेले अभियंते, उद्योजक, तंत्रज्ञ आणि राष्ट्रनिर्माते यांच्यावर उभा आहे. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण करतील अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात. माजी विद्यार्थ्यांचे बौद्धिक भांडवल विद्यापीठाच्या प्रयोगशाळा, विद्यार्थी आणि स्टार्टअप परिसंस्थेशी जोडले गेल्यास सीओईपी मार्गदर्शन आणि नवोपक्रमाचे एक शक्तिशाली चक्र तयार होऊ शकते. यामुळे मोठी गुंतवणूक, नवीन उद्योग आणि शाश्वत प्रभाव निर्माण होऊ शकतो.

चिखली येथे २८ एकर जागेत आयआयटीच्या दर्जाचे संशोधन केंद्र सीओईपी विकसित करीत आहे. पदवीऐवजी सध्याच्या पिढीचा कल छोट्या अभ्यासक्रमांकडे असून नजीकच्या काळात ग्रामीण विद्यार्थ्यांना अर्थाजनसाठी सक्षम करणाऱ्या छोट्या अभ्यासक्रमांची देखील आखणी करणे आवश्यक आहे, असे पाटील यांनी सांगितले. सीओईपीमध्ये जागतिक पातळीवरील सुविधा विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न आहे. विद्यापीठाचा परिसर संशोधकांचा परिसर म्हणून विकसित करण्याकडे कल आहे. सीओईपी माजी विद्यार्थी संघटना अतिशय सक्षम आणि कृतीशील आहे, असे पै यांनी नमूद केले.

मुलीेंसाठी वसतिगृह, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

पाटील यांनी कार्यक्रमात दोन घोषणा केल्या. त्यात सीओईपीमध्ये मुलींसाठी वसतिगृहाची कमतरता जाणवल्यामुळे मुलींसाठी ४०० क्षमतेचे वसतिगृह शासकीय निधीसह सीएसआरमधून बांधण्यात येईल. वसतिगृह पुढील वर्षी कार्यान्वित करण्यात येईल. तसेच वसतिगृह शुल्क भरणे अडचणीचे असलेल्या ग्रामीण भागातील १० विद्यार्थिनींना दरमहा १० हजार रुपये याप्रमाणे १० महिन्याचे १ लाख रुपये देण्याची, आणि कमवा आणि शिका अंतर्गत ५० विद्यार्थी, विद्यार्थीनींना खर्चासाठी महिन्याला २ हजार रुपये मिळतील असे काम देण्याची आणि त्यासाठी दरमहा १ लाख रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले.