पुणे : सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या १६०० हून अधिक विद्यार्थ्यांना आता भारतीय ज्ञान प्रणालीचे धडे मिळणार आहेत. त्यासाठी सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, भांडारकर संस्थेने विकसित केलेला दोन श्रेयांकांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

भांडारकर संस्थेत झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ज्येष्ठ मूर्तिशास्त्रतज्ज्ञ गो. बं. देगलूरकर, परिमल अँड प्रमोद चौधरी फाऊंडेशनच्या संस्थापिका परिमल चौधरी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, सीओईपीचे सहायक अधिष्ठाता डॉ. प्रशांत बारटक्के, अप्लाइड सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. महेश शिंदीकर, एनईपी व आयकेएसच्या समन्वयक डॉ. प्रीतम सेलमोकर, भांडारकर संस्थेचे विश्वस्त भरत फाटक, विद्या परिषद प्रमुख प्रमुख डॉ. प्रदीप आपटे, भारतविद्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाच्या प्रमुख व महाभारत कल्चरल इंडेक्सच्या कार्यकारी संपादक डॉ. गौरी मोघे, इंडी हेरिटेजचे संस्थापक तुषार जोशी या वेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान प्रणालीचा (आयकेएस) दोन श्रेयांकांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम भांडारकर संस्थेने भारतविद्या या डिजिटल व्यासपीठाद्वारे विविध विद्यापीठे, महाविद्यालयांना उपलब्ध करून दिला आहे.

समृद्ध भारतीय परंपरा उज्ज्वल भूतकाळापुरती न राहता, वर्तमानात आणि युवा पिढीच्या मनात कशी रुजवता येईल, याचा विचार आणि कृती आवश्यक आहे. भांडारकर संस्थेचे ‘भारतविद्या’ हे व्यासपीठ तरुण पिढीला आणि आधुनिक काळाला या वारशाशी जोडण्यास साह्यभूत ठरेल. वर्तमानाचे भान सोडून भूतकाळात रमण्यापेक्षा समृद्ध गतकाळाचा धागा वर्तमानाशी नेमका कशा प्रकारे जोडता येईल, यादृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले आहेत आणि त्यासाठी श्रेयांकही देण्यात आले आहेत, असे भांडारकर संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत यांनी सांगितले.

प्रमोद अँड परिमल चौधरी फाउंडेशनकडून एक वर्षाचे शुल्क

करारांतर्गत सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या १६००हून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे एक वर्षांचे शुल्क परिमल अँड प्रमोद चौधरी फाऊंडेशनतर्फे दिले जाणार आहे. या बाबत परिमल चौधरी म्हणाल्या, ‘हजारो वर्षांचा ज्ञानवारसा भांडारकर, डेक्कन कॉलेजसारख्या संस्थांनी जपला आहे. सीओईपीसारखी प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था गुणवत्तापूर्ण तंत्रस्नेही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून युवा पिढी घडवत आहे. त्यामुळे युवा पिढीसाठी वारसा जतन आणि संशोधन करणारी संस्था, तंत्रस्नेही विद्यापीठ एकत्र आल्यास ज्ञानपरंपरा, संस्कृतीकडे पाश्चात्त्य नजरेने न पाहता, भारतीय दृष्टीने पाहण्यास विद्यार्थ्यांना साह्य होईल. त्यामुळे फाऊंडेशनने सहकार्य केले आहे.