उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यासह पुण्यात चांगलाच थंडीचा कडाका वाढला आहे. शहरात पहिल्यांदाच तापमान सात अंशांवर आल्यामुळे पुणेकर गारठले आहेत. येत्या चोवीस तासात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. राज्यातील किमान तापमान सरासरीच्या खाली गेले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील तापमान सरासरीच्या फारच खाली आले आहे. राज्यात नाशिक येथे सर्वात कमी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरातही गेल्या काही दिवसांपासून तापमान दहा अंशाच्या खाली आले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कायम आहे. शनिवारी व रविवारी तापमान सात अंशावर आले आहे. रविवारी नोंदले गेलेले ७ अंश तापमान हे हंगामातील निच्चांकी तापमान होते. सकाळ व सायंकाळी थंडीचा चांगलाच कडाका जाणवत होता. रात्री शहरात शेकोटय़ा पेटल्याचे चित्र पाहायला मिळाले. येत्या चोवीस तासात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.