वाढत चाललेली थंडी आणि हवेतील कोरडेपणा या वातावरणात अंगाला तेल लावून मालीश करुन घेणे आणि वाफेने शेकणे असे उपचार करुन घेण्यासाठीच्या केंद्रांमध्ये सध्या मोठी गर्दी दिसून येत आहे. स्नायू, सांधे व चेतापेशींची दुखणी असलेले रुग्ण मालीश, ‘स्टीम बाथ’ व पंचकर्म उपचारांचा आधार घेत आहेतच, पण काहीही आजार नसलेले रुग्ण आवर्जून मसाजसाठी जात असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवले.
ताराचंद रुग्णालयाच्या पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र हुपरीकर यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘थंडीत शरीरातील वात वाढत असल्यामुळे विविध प्रकारच्या वेदनांवरील उपचारांसाठी मालीश आणि शेक घेण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. दिवाळीनंतर थंडी पडू लागली की हळूहळू रुग्णांचा ओघ वाढतो. काही दिवसांपूर्वी थंडी खूप जास्त होती, तसेच रात्रीच्या व दिवसाच्या तापमानातही मोठा फरक होता. त्या वेळी श्वसनसंस्थेचे विकार बळावतात. अॅलर्जिक सर्दी- खोकला व दम्याची प्रवृत्ती असलेल्यांना ऋतुबदलाच्या वेळेस पंचकर्मातील काही विशिष्ट उपचार सुचवले जातात. गेल्या काही वर्षांत पंचकर्म उपचारांची लोकप्रियता वाढत आहे. पंचकर्मातील काही उपचारांपूर्वी मालीश व शेक घेण्यास सांगितले जाते. थंडीत शेकाचे विविध प्रकार शरीराला सोसवू शकतात.’’
प्रतिबंधक मसाज व स्टीम बाथसारख्या उपचारांसाठीची पॅकेजेस देखील या दिवसांत विविध केंद्रांकडून बाजारात आणली जात आहेत. ‘आयुर्वेद लाईफस्टाईल क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर’च्या डॉ. शिल्पा थोरात म्हणाल्या,‘‘थंडीत मसाज व पंचकर्माला असलेला प्रतिसाद वाढला आहे. या दिवसांत वातावरण चांगले असणे हे याचे एक प्रमुख कारण आहे. प्रतिबंधक म्हणून मालीशसारखे उपचार करुन घेणाऱ्यांमध्ये वृद्ध मंडळी अधिक दिसतात, तर तरुणांचा कल ‘स्टीम बाथ’कडे असतो.’’
‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ नेचरोपॅथी’च्या योग व निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. ज्योती कुंभार म्हणाल्या,‘‘आमच्याकडे सर्व ऋतूंमध्ये सारख्याच प्रमाणात रुग्णांचा ओघ असतो, पण थंडीत मालीश करुन घेणे अधिक आरोग्यदायी समजले जाते. स्नायू व सांधेदुखीचे रुग्ण त्या-त्या दुखण्यावर किंवा पाठ वा पायांना मालीश करण्यासाठी येतात.’