scorecardresearch

पुणे: परवानाधारक शस्त्रे जमा करा; ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

पुणे: परवानाधारक शस्त्रे जमा करा; ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
(संग्रहित छायचित्र)

जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात निवडणूक काळात आवश्यक निर्बंध जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लागू केले आहेत. निवडणूक सुरळीत, शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून २३ डिसेंबरपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. तसेच या ग्रामपंचायत क्षेत्रातील परवानाधारक शस्त्रे असलेल्या नागरिकांनी त्यांची शस्त्रे जमा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>तांत्रिक बिघाडामुळे वायुदलाचे हेलिकॉप्टर बारामतीच्या शेतात; आपत्कालीन स्थितीत उतरविले, कोणालाही इजा नाही

राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापन झालेल्या अशा जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. १८ डिसेंबरला मतदान, तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तसेच निकाल जाहीर करण्याची अंतिम तारीख २३ डिसेंबर असून या तारखेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पिंपरीः कामगारांच्या प्रश्नांसाठी महापालिका, शहरातील उद्योजकांचे एकत्रित प्रयत्न

दरम्यान, निवडणूक काळात शस्त्रांचा गैरवापर होऊ शकतो, अशा ३८४ शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीसांना दिले आहेत. यामध्ये जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात, भोर २४, घोडेगाव चार, खेड आठ, आळेफाटा चार, माळेगाव ५३, वडगाव निंबाळकर ४९, वालचंदनगर ४०, भिगवण २९, इंदापूर १९, यवत २२, शिरुर नऊ, रांजणगाव तीन, राजगड १४, वेल्हा ६८, पौड २०, लोणावळा ग्रामीण दोन, लोणावळा शहर एक, मंचर चार आणि पारगाव पोलीस ठाणे हद्दीतील चार शस्त्र परवानाधारकांचा समावेश आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

मतदान व मतमोजणी केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

२२१ ग्रामपंचायतीसाठी मतदान ते मतमोजणीपर्यंत मतदान आणि मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर सभोवतालच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित दिवशी या परिसरातील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यिक आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 18:03 IST

संबंधित बातम्या