विद्यमान जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी नागपूरचे जिल्हाधिकारी असलेले सौरभ राव यांची नियुक्ती झाली आहे. १० फेब्रुवारीला किंवा त्याअगोदरच राव पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदग्रहण करतील. मात्र, देशमुख यांना अद्याप बदलीचे आदेश मिळालेले नाहीत.
निवडणुकांच्या मार्गदर्शकांनुसार, ज्या अधिकाऱ्यांना ३१ मे २०१४ ला किंवा त्यापूर्वी पदावर तीन वर्षे पूर्ण होत आहेत त्यांना बदलीचे आदेश देण्यात येत आहेत. राव यांना सोमवारी संध्याकाळी उशिरा सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश मिळाले आहेत.
राव यांनी या पूर्वी सोलापूर आणि नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी काम केले आहे. ते गोंदियाच्या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरही कार्यरत होते. तसेच वध्र्यात त्यांनी महसूल खात्यात महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. राव म्हणाले, ‘‘बदलीचे आदेश मिळाले असले तरी लगेच ऋजू व्हायचे की ९ फेब्रुवारीला नागपूरमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘कृषी वसंत’ या कार्यक्रमासाठी थांबायचे याबद्दल मला शासनाचा सल्ला घ्यावा लागणार आहे. तसेच अजून नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी नव्याने कोणाचीही नियुक्ती झाली नसल्याने मला पदभार सोडण्यापूर्वी विभागीय आयुक्तांशीही चर्चा करावी लागेल.’’ पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना नुकतीच सचिव स्तरावर बढती मिळाली आहे.