पाणीटंचाईच्या काळात गणेश विसर्जनासाठी नदीत पाणी सोडू नये या मागणीसाठी पुण्यातील पर्यावरण कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली असून, या संदर्भात जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे.
या संदर्भात शिवानी कुलकर्णी आणि सारंग यादवाडकर यांनी अ‍ॅड. असिम सरोदे, अ‍ॅड. मृणालिनी शिंदे, अ‍ॅड. प्रताप विटनकर यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. सध्या पाण्याची टंचाई असताना विसर्जनासाठी नदीत पाणी सोडू नये, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. या संदर्भात संबंधित यंत्रणांना हरित न्यायाधिकरणाचे न्या. विकास किनगावकर व डॉ. अजय देशपांडे यांच्या आदेशावरून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस आयुक्त अशा सर्व प्रतिवादींना येत्या गुरुवारी (२४ सप्टेंबर) न्यायाधिकरणासमोर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.