पेरणे फाटा येथे १ जानेवारी होणाऱ्या ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. नागरिकांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३० डिसेंबर रोजी मध्यरात्रीपासून २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
कोणतीही व्यक्ती इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती प्रसारित करणार नाहीत किंवा पुढे पाठविणार नाही याची जबाबदारी संबंधित माहिती प्रसार करणाऱ्या व्यक्ती आणि समूह प्रमुखाची (ग्रुप ॲडमिन) असेल. पुणे ग्रामीण हद्दीमधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी फलक, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध असणार आहे. यामध्ये शासकीय विभाग आणि यंत्रणांना सवलत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद केले आहे.