scorecardresearch

पुण्यात बसच्या चाकाखाली सापडून महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू; बुलेटचालकाच्या बेदरकारपणामुळे घडला अपघात

बुलेट चालकास पोलिसांना अटक केली आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

भरधाव वेगाने जाणाऱ्या बुलेटने धडक दिल्यानंतर पादचारी महाविद्यालयीन तरुणी बसच्या चाकाखाली सापडून मृत्युमुखी पडल्याची घटना शिवाजी रस्त्यावर शनिवार वाडा परिसरात घडली.

शीतल बाळासाहेब पवार (वय २५, मूळ रा. इंदापूर, सध्या रा. हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी बुलेटचालक इम्रान इजाज शेख (वय २२, रा. गणेश पेठ) याला अटक करण्यात आली. चेतन कोकरे (वय २५, मूळ रा. बारामती, सध्या रा. हडपसर) याने या संदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शीतल आणि तिचा मित्र चेतन रविवारी (१७ एप्रिल) सायंकाळी शनिवारवाडा परिसरात फिरायला आले होते. शनिवारवाडा पाहिल्यानंतर दोघेजण श्री कसबा मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्या वेळी भरधाव वेगाने बुलेटस्वार शेख तेथून जात होता. रस्ता ओलांडणारी शीतल आणि चेतन यांना बुलेटने धडक दिली. शीतल रस्त्यावर तोल जाऊन पडली आणि त्याच वेळी शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जात असलेल्या बसच्या चाकाखाली ती सापडली.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शीतलला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे तपास करत आहेत. शीतल एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: College girl dies after falling under bus wheel in pune the accident happened due to the negligence of the bullet driverpune print news msr