संरक्षणाचे मानबिंदू हे सदर दर १५ दिवसांनी गुरुवारी प्रसिद्ध होते. गेल्या भागात आपण, ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’ची (एएफएमसी) माहिती घेतली. यंदा दापोडी येथील ‘कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग’ अर्थात ‘सीएमई’विषयी माहिती घेऊ.देशाच्या सुरक्षेमध्ये संरक्षण दलांतील प्रत्येक घटकाचे महत्त्व कायम असते.
युद्ध असो अथवा शांततेचा काळ सीमेवर शत्रूशी दोन हात करणाऱ्या जवानाबरोबरच दळणवळण सोपे व्हावे, सैनिकांची आगेकूच यशस्वी व्हावी, आपले जवान सुरक्षित राहावेत, यासाठी प्रसंगी प्राणाची बाजी लावणारे एक महत्त्वाचे कोअर म्हणजे ‘कोअर ऑफ इंजिनीअर्स’.भारतीय लष्कराचा हा सर्वांत जुना विभाग. याचा इतिहास १७८०पर्यंत जातो. यामध्ये सर्वप्रथम स्थापना झाली, ती ‘मद्रास सॅपर्स’ची.
त्यानंतर बंगाल आणि ‘बॉम्बे सॅपर्स’ची स्थापना करण्यात आली. याला १९३२ मध्ये आधुनिक रूप मिळाले. ‘कोअर ऑफ इंजिनीअर’मध्ये या सर्वांचे एकत्रिकरण करण्यात आले. या कोअरमध्ये चार महत्त्वाचे घटक आहेत. लढाऊ अभियंते (कॉम्बॅट इंजिनीअर्स), लष्करी अभियांत्रिकी सेवा (एमईएस, मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेस), सीमा रस्ते (बॉर्डर रोड्स) आणि मिलिटरी सर्व्हे.
एकाच वेळी आपल्या सैनिकांची आगेकूच निर्धोक होण्यासाठी त्यांना मार्ग उपलब्ध करून देताना शत्रू आपल्यावर चालून येऊ नये म्हणून वाटेत अडथळे तयार करण्याचे कामही लढाऊ अभियंते करतात. पूल बांधणे, हेलिपॅड तयार करणे, शत्रूच्या मार्गात सुरुंग लावून अडथळे तयार करणे आदी कामे हे अभियंते करतात. ‘कोअर ऑफ इंजिनीअर्स’मध्ये अनेकांनी शौर्य गाजविले आहे.
या विभागाने १९४७ पासून प्रत्येक संघर्षात, युद्धात मोलाची कामगिरी केली आहे. जनरल पी. एस. भगत यांना दुसऱ्या महायुद्धात बजावलेल्या कामगिरीबद्दल ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ प्रदान करण्यात आला. याखेरीज सुभेदार सुब्रह्मण्यम यांना ‘जॉर्ज क्रॉस’ प्रदान करण्यात आला. काश्मीरमध्ये असीम शौर्य दाखविल्याबद्दल मेजर रामा राघोबा राणे यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. याखेरीज, संयुक्त राष्ट्रसंघात विविध मोहिमांमध्ये हा विभाग सहभागी झाला आहे.
‘मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसे’स (एमईएस) हादेखील महत्त्वाचा विभाग. केवळ, भूदल, नौदल आणि हवाई दलालाच नव्हे, तर संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), केव्ही संघटन, दारुगोळा कारखाने यांच्यासाठीही हा विभाग महत्त्वाचा आहे. अनेक महत्त्वाचे प्रकल्प या विभागाने वेळेत पूर्ण केले आहेत.सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) महत्त्व सर्वश्रुत आहे.
हिमालयीन पर्वतरांगांत आणि अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ‘बीआरओ’ने तयार केलेल्या रस्त्यांमुळे सैन्याची हालचाल अधिक वेगवान होते.‘कोअर ऑफ इंजिनीअर्स’चे बोधवाक्य या विभागाला साजेसे असेच आहे. ‘सर्वत्र’. सगळीकडे सर्वकाळ उपस्थिती. युद्धकाळ, शांतता काळ, नैसर्गिक आपत्ती अशा सर्वांमध्ये हा विभाग सदैव कार्यरत असतो. नागरिकांसाठीही ‘कोअर ऑफ इंजिनीअर्स’मधील जवान संकटमोचक ठरतात.
अशा अत्यंत महत्त्वाच्या विभागासाठी लागणारे लढाऊ अभियंते तयार करणारी महत्त्वाची प्रशिक्षण संस्था पुण्याजवळ दापोडी येथे आहे. ‘कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग’, ‘सीएमई’. लष्करासाठी अभियांत्रिकी प्रशिक्षण देण्यामध्ये ‘सीएमई’ दीर्घ काळ अविरत सेवा बजावत आहे. हे महाविद्यालय पूर्वी रूरकी येथे १९४३मध्ये ‘स्कूल ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग’ म्हणून स्थापन करण्यात आले होते.
आताच्या ठिकाणी १९४८ मध्ये ते हलविण्यात आले. १९५१ मध्ये ‘कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग’ असे नाव देण्यात आले. हे महाविद्यालय जवाहरलाल नेहरू विद्यापीठाशी संलग्न आहे.दापोडी येथे विस्तीर्ण परिसरात, मुळा-मुठा नदीच्या संगमावर हे महाविद्यालय आहे. ‘सीएमई’चा परिसर जैवविविधतेने भरलेला आहे. ‘सीएमई’मध्ये वेट लँड विकास प्रकल्पांतर्गत तीन सरोवरे तयार करण्यात आली आहेत.
अनेक पक्ष्यांचे वास्तव्य या ठिकाणी आहे. जैवविविधतेचे जतन आणि संवर्धनही या ठिकाणी होत आहे. ‘सीएमई’मध्ये ‘हर्बल गार्डन’ विकसित करण्यात आले आहे. अभ्यासाच्या सर्व साधनांबरोबरच क्रीडा आणि इतर सर्व आवश्यक बाबींसाठी सुविधा उपलब्ध आहे. याखेरीज, अनेक सुविधा परिसरात उपलब्ध आहेत. क्रीडा, मनोरंजनाच्या साधनांसह अद्ययावत सुसज्ज संग्रहालयही आहे.
या ठिकाणी लढाऊ अभियांत्रिकी प्रशिक्षणाबरोबरच सुरक्षा दलांना रासायनिक, जैविक, उत्सर्जनात्मक आणि आण्विक सुरक्षेसंदर्भातही प्रशिक्षण दिले जाते. बी. टेक., एम.टेक चे अभ्यासक्रम येथे चालविले जातात. ‘कोअर ऑफ इंजिनीअर’साठी आवश्यक प्रशिक्षण येथे दिले जाते. लढाऊ अभियांत्रिकी, एमईएस, सीमा रस्ते संघटना (बीआरओ) आणि सर्व्हे अशा सर्व क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरेल, अशा प्रशिक्षणाचा समावेश यात आहे.
संरक्षण दलांतील इतर विभागांना, निमलष्करी दलांना, काही ठरावीक नागरिकांनाही ‘सीएमई’द्वारे प्रशिक्षण दिले जाते. ‘सीएमई’मध्ये १०+२ तांत्रिक प्रवेश योजनेंतर्गत ‘कॅडेट्स ट्रेनिंग विंग’मध्ये (सीटीडब्लू) बारावीनंतर सेवा निवड मुलाखतीद्वारेही (एसएसबी) प्रवेश घेता येतो.एकंदरीतच देशामध्ये लढाऊ अभियांत्रिकीची उणीव भरून काढण्यात ‘सीएमई’चा वाटा मोठा आहे. पुण्याच्या शिरपेचात या संस्थेमुळे मानाचा तुरा खोवला गेला आहे.
prasad.kulkarni@expressindia.com
