पुण्यात योग आणि निसर्गोपचार महाविद्यालय सुरू होणार – केंद्रीय ‘आयुष’ मंत्र्यांची माहिती

पुण्यात योग आणि निसर्गोपचारांचे प्रशिक्षण देणारे महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ‘आयुष’ (आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी) मंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी दिली आहे.

पुण्यात योग आणि निसर्गोपचारांचे प्रशिक्षण देणारे महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ‘आयुष’ (आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी) मंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी दिली आहे.
पुण्यातील निसर्गोपचार महाविद्यालयासाठीच्या जागेसंबंधी बोलणी सुरू असल्याचेही नाईक यांनी सांगितले. देशात साडेपाच वर्षांचा निसर्गोपचारांचा अभ्यासक्रम शिकवणारी १७ मान्यताप्राप्त महाविद्यालये आहेत. परंतु यातील एकही महाविद्यालय महाराष्ट्रात नाही. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या निसर्गोपचार महाविद्यालयाकडे आशेने पाहिले जात आहे.
राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेत सुरू करण्यात आलेल्या डॉ. दिनशॉ मेहता मेमोरिअल बाह्य़रुग्ण विभागाच्या उद्घाटनासाठी नाईक शुक्रवारी पुण्यात आले होते. आयुष मंत्रालयाचे सचिव निलंजन सन्याल, आदिवासी विकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे या वेळी उपस्थित होते. आयुष उपचारपद्धतींना उपचारांच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असून या पद्धती स्वस्त व दुष्परिणामरहित असल्याबद्दल प्रसार होणे आवश्यक असल्याचे नाईक यांनी सांगितले.
निलंजन सन्याल म्हणाले, ‘‘आतापर्यंत आयुष उपचारपद्धतींबाबत सरकार तितकेसे सक्रिय नव्हते. मात्र आता या उपचारपद्धतींचा विस्तार वाढवण्याचे आम्ही ठरवले आहे. त्याअंतर्गत देशात आणखी आयुष उपचार केंद्रे उघडली जातील.’’ आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांना ठरावीक प्रशिक्षणानंतर अॅलोपॅथीची औषधे देण्याची तसेच गर्भपात करण्याची परवानगी मिळण्याबाबतच्या प्रश्नावर ‘विविध वैद्यकीय उपचारपद्धतींचा एकत्रितपणे विचार करण्यावर आमचा भर आहे,’ असे सन्याल यांनी सांगितले.

‘औषधी वनस्पतींची लागवड,
औषधांची गुणवत्ता यावर भर देणार’
औषधी वनस्पतींच्या लागवडीवर ‘आयुष’ भर देणार असल्याचे सन्याल यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘सध्या औषधी वनस्पतींपैकी ७० टक्के वनस्पती वनांमधून येतात. वनांवरील भार कमी करून औषधी वनस्पतींची लागवड वाढवली जावी असा प्रयत्न आहे. यासाठी नवीन लागवड पद्धती व नवीन प्रकारची खते वापरण्यावर भर दिला जाईल. आयुष उपचारपद्धतींमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांची गुणवत्ता वाढवण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील असून यात ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या ‘जीएमपी’ (गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस) अंतर्गत प्रमाणित दर्जा गाठता यावा असे उद्दिष्ट आहे.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: College of yoga and naturopathy in pune