वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असताना हिंदू देव-देवतांचा अवमान केल्याप्रकरणी पुण्यात एका महाविद्यालयीन शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. संबंधित शिक्षक हिंदू देवतांचा अवमान करत असताना वर्गातील एका विद्यार्थ्याने संबंधित शिक्षकाचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) सदस्यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केलं.
संबंधित शिक्षकाला अटक करावी, अशी मागणी एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी केली. यानंतर आज (गुरुवार) डेक्कन जिमखाना पोलिसांनी संबंधित शिक्षकाला अटक केली आहे. अशोक ढोले असं अटक केलेल्या शिक्षकाचं नाव आहे. आरोपी शिक्षक अशोक ढोले हे वर्गात शिकवत असताना हिंदू देवतांवर विशिष्ट टिप्पणी करताना व्हिडीओत दिसले आहेत.
अशोक ढोले हे पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे शिकवण्याचं काम करत होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने त्यांना निलंबित केलं आहे.
हेही वाचा- बीचवर फिरायला आलेल्या अमेरिकन तरुणीबरोबर भयावह प्रकार, दोघांनी आधी दारू पाजली अन्…
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हृषिकेश सोमण यांनी ‘पीटीआय’ला सांगितलं की, संबंधित शिक्षक वर्गात शिकवत असताना एका विद्यार्थ्याने व्हिडीओ शूट केला. त्यानंतर, विद्यार्थी संघटनेच्या काही सदस्यांनी व्हिडीओसह आमच्याशी संपर्क साधला आणि कारवाईची मागणी केली. या प्रकारानंतर आम्ही संबंधित शिक्षकाला निलंबित केलं आहे. हे सरकारी अनुदानित महाविद्यालय असल्याने चौकशी सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हेही वाचा- तीन हजार रुपयांच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, चाकूने वार करत केलं रक्तबंबाळ
डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्हीव्ही हसबनीस यांनी सांगितलं की, शिक्षक अशोक ढोले यांना भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (धार्मिक भावना दुखावणे) अंतर्गत अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केलं जाईल.