scorecardresearch

महाविद्यालये लवकरच बहुविद्याशाखीय स्वायत्त संस्था

देशातील महाविद्यालयांचे २०३५ पर्यंत पदवी देणाऱ्या बहुविद्याशाखीय स्वायत्त संस्थांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

‘यूजीसी’कडून देशभरातील शिक्षण संस्थांना सूचना

पुणे : देशातील महाविद्यालयांचे २०३५ पर्यंत पदवी देणाऱ्या बहुविद्याशाखीय स्वायत्त संस्थांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) जाहीर केल्या असून, या अंतर्गत दुहेरी पदवी, शासकीय आणि खासगी महाविद्यालयांचा समूह, महाविद्यालयांचे विलीनीकरण, बहुविद्याशाखीय संशोधन आदी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत.

नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये बहुशाखीय शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासावर या धोरणात भर देण्यात आला आहे. तसेच उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये किंवा विद्यापीठे म्हणजे काय हेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वेगवेगळय़ा विद्याशाखांच्या शिक्षणाची, लवचिक अभ्यासक्रमाची सुविधा असलेल्या उच्च शिक्षण संस्था निर्माण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयांचे बहुविद्याशाखीय स्वायत्त संस्थांमध्ये रुपांतर करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना तयार करून त्याचा मसुदा संकेतस्थळावर जाहीर केला आहे. या मसुद्यावर २० मार्चपर्यंत हरकती सूचना मागवण्यात आल्या आहेत.

सध्याच्या पद्धतीनुसार विद्यापीठाकडून पदवी दिली जाते आणि महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न असतात. विद्यापीठाशी संलग्न असलेली स्वायत्त महाविद्यालये पदवी प्रदान करू शकतात. मात्र प्रस्तावित मार्गदर्शक सूचनांमध्ये जवळच्या महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह संस्था केल्यास ती विद्यापीठाचा घटक होऊ शकेल किंवा स्वायत्त संस्था होऊ शकेल. समूह संस्थेला बहुविद्याशाखीय शिक्षणासाठीचे नवीन विभाग सुरू करता येतील, अभ्यासक्रम निर्मिती, परीक्षा पद्धती, पदवी देता येईल. यूजीसीच्या नियोजनानुसार ही व्यावसायिक आणि पारंपरिक विद्याशाखांचा समावेश असलेली एकात्मिक उच्च शिक्षण प्रणाली आहे. नव्या शैक्षणिक धोरणात नमूद केल्याप्रमाणे २०३० पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात मोठी बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

विद्यापीठाचे प्रकार आणि दुहेरी पदवी

बहुविद्याशाखीय शिक्षणासाठी यूजीसीने संशोधन केंद्री (आरयू), अध्यापन केंद्री (टीयू) आणि पदवी देऊ शकणारी स्वायत्त उच्च शिक्षण संस्था असे प्रकार निर्माण केले आहेत. त्यातील संशोधन केंद्री आणि अध्यापन केंद्री ही मोठी विद्यापीठे असतील. नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन वेगळय़ा विद्यापीठांची पदवीची (दुहेरी पदवी) मुभाही मिळणार आहे. त्यासाठी उच्च शिक्षण संस्थांमध्ये सामंजस्य करार आवश्यक असेल. तसेच मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमही राबवता येतील.

समूह महाविद्यालये आणि विलीनीकरण

नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कमी प्रवेश होणाऱ्या महाविद्यालयांचे विलीनीकरण आणि समूह महाविद्यालयाची तरतूद करण्यात आली आहे. या द्वारे शैक्षणिक स्रोत सुधारणे आणि संस्थांचे नॅक मूल्यांकन उंचावणे शक्य होईल. यात खासगी महाविद्यालये विलीनीकरण आणि शासकीय महाविद्यालयांचे विलीनीकरण असे स्वतंत्र प्रकार आहेत. या समूह महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज सुरळीत राहण्यासाठी संचालक मंडळ, विद्या परिषद, वित्त समितीची तरतूद आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यापीठ आणि शासनाची जबाबदारी महत्त्वाची ठरणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संशोधनाला चालना..

उच्च शिक्षण संस्थांमध्ये बहुविद्याशाखीय संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संशोधनासाठी पूरक वातावरण निर्मिती करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संशोधन करून ते संशोधन पत्रिकांमध्ये प्रसिद्ध करणे, एकस्व अधिकार नोंदणी, शोधनिबंध लिहिता येतील. बहुविद्याशाखीय संशोधनासाठी उच्च शिक्षण संस्थांनी उद्योगांशी जोडले जाऊन विद्यार्थ्यांना कार्यानुभव देता येईल. उच्च शिक्षण संस्था एकत्र येऊन त्यांच्याकडील प्राध्यापक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन करू शकतील.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Colleges multidisciplinary autonomous institution suggestions ugc educational institutions ysh

ताज्या बातम्या