पुणे : गेल्या दीड वर्षांपासून सुने सुने असलेले महाविद्यालयांचे परिसर बुधवारी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा बहरले. महाविद्यालयाच्या परिसरात गप्पा मारत उभे असलेले विद्यार्थ्यांचे घोळके, कट्टय़ांवर रंगलेल्या गप्पा-हास्यविनोद चित्र पाहायला मिळाले.

करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने महाविद्यालये सुरू करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून करण्यात येत होती. १८ वर्षे पूर्ण केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असूनही महाविद्यालय सुरू नसल्याने त्यांना घरीच राहावे लागत होते. पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर राज्य स्तरावर सूत्रे हलून राज्य शासनाने राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात प्रवेश, क्षमतेच्या ५० टक्के  विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश, टप्प्याटप्प्याने वसतिगृहे सुरू करणे आदी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील महाविद्यालये सुरू झाली. गेल्या काही दिवसांत महाविद्यालयांमध्ये अकरावी, प्रथम वर्षांची प्रवेशप्रक्रिया, प्रमाणपत्र आदी कारणांनी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. मात्र खऱ्या अर्थाने महाविद्यालय सुरू झाल्याचा उत्साह विद्यार्थ्यांमध्येही दिसत होता. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्याची तपासणी करण्यात येत होती. युवासेनेतर्फे गरवारे महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मुखपट्टी, निर्जंतुकीकरण द्राव, गुलाबपुष्प देण्यात आले. महाविद्यालयांतील कट्टय़ांवर विद्यार्थ्यांच्या गप्पाटप्पा रंगल्या, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने महाविद्यालयांच्या परिसरात नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी वर्गामध्ये साधारणपणे वीस ते चाळीस टक्के उपस्थिती होती, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिकेही झाली.

ओकेबोके, रिकामे वर्ग पाहणे त्रासदायक होते. मात्र आता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने महाविद्यालयात जिवंतपणा आला. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले, तरी शिक्षक-विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटीला पर्याय नाही हे अधोरेखित झाले.

डॉ. गणेश राऊत, प्रभारी प्राचार्य, एच. व्ही. देसाई महाविद्यालय

विद्यार्थी वर्गात परतल्याने खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांमध्येही उत्साह आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला होता.

– डॉ. सविता दातार, प्रभारी प्राचार्य, स. प. महाविद्यालय