वेगवेगळे दिवस, उपक्रम, परिषदा, नियमित तासिका, स्नेहसंमेलने, अभ्यास सहली अशा वर्षभराच्या वेळापत्रकात एकदा पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयांची तारांबळ होत आहे. आता त्यात भर पडून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार महाविद्यालयांनाही वर्षांतून दोन वेळा पदवी प्रदान समारंभ आयोजित करावे लागणार आहेत. वेळेबरोबरच समारंभाच्या खर्चाचाही प्रश्न असल्याचे महाविद्यालयांच्या प्राचार्याकडून सांगण्यात येत आहे.

आतापर्यंत वर्षभरातून एकदा विद्यापीठात पदवी प्रदान समारंभ आयोजित केला जात असे. मात्र विद्यापीठाने पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांचा पदवी प्रदान समारंभ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर आयोजित करण्याचा फतवा काढला. गेल्या वर्षीपासून पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांच्या स्तरावर समारंभाचे आयोजन करण्यात येते.

वर्षभराच्या वेळापत्रकातून समारंभाचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयांची त्रेधा उडत होती. आता त्यात आणखी भर पडून महाविद्यालयांनाही दोनदा पदवी प्रदान समारंभ आयोजित करावा लागणार आहे. त्यातच यंदापासून येऊ घातलेल्या विद्यार्थी निवडणुका, रोज नव्याने येणारी अभियाने यात बराच वेळ खर्च होत असल्याची तक्रार महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे. महाविद्यालयांच्या स्तरावर घेण्यात येणाऱ्या पदवी प्रदान समारंभांचा बहुतेक सर्व खर्चही महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर करावा लागतो. छोटय़ा महाविद्यालयांना याचा फटका बसणार असल्याचे मत प्राचार्यानी व्यक्त केले आहे.