मोटार अपघात न्यायाधिकरणाच्या प्रयत्नांमुळे ९३ खटल्यांमधील ८५ पक्षकारांना सव्वादहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित महा लोकअदालतच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई मिळाली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना या नुकसान भरपाईमुळे दिलासा मिळाला आहे.
मोटार अपघात न्यायाधिकरणापुढे तडजोडीने निकाली काढण्यासाठी २१० खटले ठेवण्यात आले होते. त्यापैकी ९३ खटले निकाली काढण्यात यश प्राप्त झाले. या खटल्यांमध्ये संबंधितांना सव्वादहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली, अशी माहिती मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य आणि जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी दिली. मोटार अपघात न्यायाधिकरणापुढे खटले निकाली काढण्यासाठी तीन सदस्यांच्या पॅनेलची नियुक्ती करण्यात आली होती. नुकसान भरपाईची ८५ प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर आठ खटले रद्दबातल ठरविण्यात आले.
एखाद्या अपघातानंतर अपघातामुळे जे अपंगत्व येते त्यासाठी नुकसान भरपाई मिळावी म्हणून अपंगत्व आलेल्या पक्षकारांकडून न्यायालयात दावा दाखल करण्यात येतो. मात्र अनेकदा पक्षकारांना अपंगत्वाचा दाखला मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यामध्ये विलंब होतो. अपंगत्वाचा दाखला मिळण्यासाठी यापूर्वी मोटार अपघात न्यायाधिकरणाने दोनदा शिबिराचे आयाोजन केले होते. शहरातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञांनी या शिबिरांमध्ये मार्गदर्शन केले. त्याचाही फायदा पक्षकारांना झाला, असे एस. व्ही. माने यांनी सांगितले.
दरम्यान, या लोकअदालत उपक्रमावर न्यायाधिकरणाकडे कार्यरत असलेल्या वकिलांनी बहिष्कार टाकला होता. बहिष्कार घातलेल्या वकिलांची आणि बार असोसिएशनची भेट घेऊन त्यांचे मन वळविले आणि त्यांच्या बहिष्काराचा फटका पक्षकारांना बसू नये म्हणून प्रयत्न केल्याचेही माने यांनी सांगितले. या प्रयत्नांनंतर वकिलांनी लोकअदालत उपक्रमावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आणि नंतर लोकअदालत व्यवस्थितरीत्या पार पडली.
मोटार अपघात न्यायाधिकरणातर्फे निकाली काढण्यात आलेल्या खटल्यांमध्ये आयसीआयसीआय लॉम्बार्डचे ३२ खटले निकाली काढण्यात आले. कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापक अमृता चटर्जी, सौरभ जयस्वाल यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले. तर खेड येथील न्यायालयात अपघात नुकसान भरपाईचे आठ खटले निकाली काढण्यात आले.