आगामी आर्थिक वर्षांतही उद्दिष्टपूर्ती अशक्यच

पुणे : महापालिकेला मिळकत करातून मिळणाऱ्या उत्पन्नाला मर्यादा असतानाही त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करत मिळकत करातून मोठे उत्पन्न तिजोरीत जमा होईल, हे गृहीत धरण्याची परंपरा यंदाही कामय राहिली आहे. एका बाजूला मिळकत कराची थकबाकी वाढत असताना दुसऱ्या बाजूला मिळकत करातून अशक्यप्राय उत्पन्न गृहीत धरण्यात येत आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाचा फुगवटा वाढत असून मिळकतकाराची उद्दिष्टपूर्तीही अशक्यच ठरत आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षांतही मिळकत करातून एक हजार ४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे चित्र असताना आगामी अंदाजपत्रकात मिळकत करातून जवळपास दोन हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.

महापालिकेच्या उत्पन्नाचा मिळकत कर हा प्रमुख आर्थिक स्रोत आहे. मिळकत कराची थकबाकीही मोठय़ा प्रमाणावर आहे. तसेच मिळकत करामध्ये वाढ करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. चालू आर्थिक वर्षांतही मिळकत करातून एक हजार ९०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे गृहीत धरण्यात आले होते. डिसेंबरअखेपर्यंत मिळकत करातून ८२६ कोटी रुपये मिळाले असून मार्चअखेपर्यंत उत्पन्न जेमतेम एक हजार ४०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा किमान ५०० कोटी रुपये कमी प्राप्त होणार आहेत. मात्र या वास्तवाकडे डोळेझाक करून आगामी अंदाजपत्रकात पुन्हा मिळकत करातून दोन हजार कोटी रुपयांचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे.

मिळकत कराची थकबाकीही मोठय़ा प्रमाणावर आहे. मोबाइल कंपन्यांच्या थकबाकीचाही यात समावेश आहे. मिळकत करापोटी जवळपास सतराशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. अंदाजपत्रक सादर करताना यंदा थकबाकी वसुलीसाठी काय उपाययोजना करणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र उत्पन्नवाढीसाठी मिळकत करामध्ये १२ टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मिळकत करामध्ये बारा टक्के वाढ केली तर जास्तीत जास्त दोनशे कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. त्यामुळे वास्तवाकडे डोळेझाक करून केवळ उत्पन्नाचे आकडे फुगविण्यातच अधिकारी रस दाखवित असल्याचे चित्र दिसत आहे.

एकूण उत्पन्नातही घट

चालू आर्थिक वर्षांत महापालिकेला सर्व स्रोतांमधून मिळून सहा हजार ७६५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे गृहीत धरण्यात आले होते. मात्र सध्या साडेतीन हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून मार्चअखेपर्यंत एकूण साडेचार हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यातही मिळकत करातून ५०० कोटी रुपयांचे कमी उत्पन्न मिळणार असून मिळकत कराची उद्दिष्टपूर्तीही अशक्यच ठरणार आहे.