पहिल्या टप्प्यात संगमवाडी-बंडगार्डन भागात काम; ३०६ कोटींची निविदा

पुणे : नदीकाठ संवर्धन आणि पुनरुज्जीवन योजनेला  संगमवाडी ते बंडगार्डन या पहिल्या टप्प्यापासून प्रारंभ होणार आहे. त्यासाठी ३०६ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात आली आहे. या टप्प्यात नदीच्या दोन्ही बाजूच्या काठांची कामे, सुशोभीकरण, संगमवाडीच्या बाजूने सायकल मार्ग, नाईक बेटाचे सुशोभीकरण आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन आणि पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत ४ हजार ७२७ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आराखडा महापालिकेकडून करण्यात आला असून पहिल्या तीन टप्प्यांची कामे करण्यास महापालिकेच्या मुख्य सभेनेही मान्यता दिली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी महापालिका सातशे कोटींचा निधी देणार असून उर्वरित दोन टप्पे सार्वजनिक खासगी लोकसहभागातून (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येणार आहेत.

योजनेअंतर्गत कामांना सातशे कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून संगमवाडी ते बंडगार्डन या साधारण चार किलोमीटर लांबीच्या अंतराची कामे हाती घेण्यात आली आहेत.पुढील अडीच वर्षात ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

सुशोभीकरण, सायकल मार्गांची उभारणी,  संगमघाट परिसरातील पुरातन वास्तूंना धक्का न लावता सुशोभीकरण, सीर्मांभती, ताडीवाला रस्ता परिसरात संरक्षक भिंती, विविध देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड, नदीपातळीची खोली वाढविणे अशी विविध कामे या टप्प्यात होणार आहेत.

मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन आणि पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत ४४.६ किलोमीटर लांबीच्या नदीकाठाचे सुशोभीकरण करण्याचे नियोजित आहे. या योजनेअंतर्गत शेकडो हेक्टर जमिनीचे निवासीकरण करण्यात येणार असून अनेक ठिकाणी बांधकामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

स्वतंत्र हेतू कंपनीच्या माध्यमातून ही कामे होणार आहेत. योजनेमुळे नदीची पूरवहन क्षमता वाढणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.