श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या निषेधार्थ संस्था, संघटना व सर्व पक्षांचे आंदोलन

काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता सर्व राजकीय पक्ष तसेच विविध संस्था, संघटनांनी आयुक्तांच्या समर्थनार्थ पिंपरीत धरणे आंदोलन केले आणि परदेशी यांची अन्यायकारक बदली रद्द करण्याची जोरदार मागणी केली.

पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीचे तीव्र पडसाद शहरात उमटले. काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता सर्व राजकीय पक्ष तसेच विविध संस्था, संघटनांनी आयुक्तांच्या समर्थनार्थ पिंपरीत धरणे आंदोलन केले आणि परदेशी यांची अन्यायकारक बदली रद्द करण्याची जोरदार मागणी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परदेशी यांची बदली केली. त्या निर्णयाचे पडसाद शहरात उमटले. परदेशी यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली झाल्याच्या निषेधार्थ पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे, उपजिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर, नगरसेवक सीमा सावळे, आशा शेंडगे, शारदा बाबर, धनंजय आल्हाट, भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक एकनाथ पवार, ‘आप’ चे नेते मारुती भापकर, मनसेचे शहराध्यक्ष मनोज साळुंके, नागरी हक्क समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, अथर्व थिएटर्सचे संस्थापक डॉ. संजीवकुमार पाटील, डॉ. श्याम अहिरराव, डॉ. श्रीकृष्ण कुलकर्णी आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते. राजकीय पक्षांशी संबंध नसलेले सामान्य नागरिकही उत्स्फूर्तपणे आले होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा करण्यात येत होत्या. परदेशी यांची बदली अन्यायकारक असून ती रद्द करण्याची मागणी या वेळी आंदोलक करत होते. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरीतील कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बदलीनंतरही आयुक्तांनी घेतलेला आढावा
श्रीकर परदेशी यांनी बदलीसंदर्भात दुसऱ्या दिवशीही कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. चिंचवडला सायन्स पार्कच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले. तेव्हा महापौर मोहिनी लांडे व पालिकेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या वेळी पालिका अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी बैठक घेतली आणि आगामी अंदाजपत्रकाचा आढावा घेतला. तेथे आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Commissioner shrikar pardeshi transfer agitation pcmc

ताज्या बातम्या