पुणे : पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या शुल्कवाढीला संशोधक विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या संदर्भात पुन्हा आढावा घेण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. समितीच्या शिफारसींनुसार शुल्कात सवलत देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाने २०१९मध्ये शुल्काची पुनर्रचना केली होती. त्यात प्रवेश शुल्क आणि कोर्सवर्कचे शुल्क वाढवण्यात आले. त्यामुळे शुल्क जवळपास दुपटीने वाढले. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे या शुल्कवाढीला स्थगिती देण्यात आली. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन शैक्षणिक कामकाज पूर्ववत होऊ लागल्याने विद्यापीठाकडून शुल्कवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ही शुल्कवाढ अवाजवी असल्याचे सांगत संशोधक विद्यार्थ्यांनी शुल्कवाढीला विरोध केला. तसेच शुल्कात सवलत देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने शुल्कवाढीचा पुन्हा आढावा घेण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून शुल्काचा आढावा घेण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती अभ्यास करून शिफारसी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांना सादर करेल. त्यानंतर शुल्कात सवलत देण्यासंदर्भात विचार करता येईल.